32.9 C
Latur
Monday, April 14, 2025
Homeमहाराष्ट्रदुचाकीचा अपघात; २ ठार

दुचाकीचा अपघात; २ ठार

छत्रपती संभाजीनगर : दोन मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुकाई देवीच्या यात्रेतून एकाच दुचाकीने ४ मित्र घराकडे परतत होते. त्याचवेळी आरो प्लांटच्या भिंतीवर दुचाकी धडकल्याने अपघात झाला. यात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव रस्त्यावर झाला.

आकाश अंबादास वाघ (वय वर्षे १९, रा. पिंपळगाव घाट ह. मु. आमठाणा, ता. सिल्लोड), विशाल पांडुरंग गायसमिंद्रे (वय वर्षे २४, रा. आमठाणा) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर अनिकेत दत्तू जगताप (वय वर्षे १६), रितेश अंबादास साळवे (वय वर्षे १८) अशी जखमींची नावे आहेत.

दरम्यान या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभई येथे तुकाईदेवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी आकाश, विशाल, रितेश आणि अनिकेत हे चार मित्र दुचाकीने गेले होते. यात्रेत देवीचे दर्शन करून एकाच दुचाकीने चौघे घरी परतत होते. ते जांभई गावापासून पुढे आले. मात्र तिथे काही अंतरावर असलेल्या आरो प्लांटच्या भिंतीवर त्यांची दुचाकी धडकली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने आरो प्लांटच्या भिंतीवर दुचाकी धडकल्याची माहिती आहे. यामध्ये दुचाकीवरील चौघेजण गंभीर जखमी झाले.

दरम्यान स्थानिकांनी चौघांना तातडीने सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी आकाश आणि विशाल या दोघांना तपासून मृत घोषित केले. तर अनिकेत, रितेश हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या भीषण अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR