Homeहिंगोलीदुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत राडा

दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत राडा

दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

हिंगोली : प्रतिनिधी
नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आल्यानंतर दुर्गादेवी विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार हिंगोलीच्या वेलतुरा गावात दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत दोन गटांत प्रचंड राडा झाला होता. यात काहींनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तर दगडफेक देखील करण्यात आली असून यात अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हिंगोलीच्या वेलतुरा गावात काल रात्री दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीत दुर्गादेवीव्यतिरिक्त कोणतेही गाणे लावू नका; असे सांगितल्यावरून वाद निर्माण झाला होता. यातून काही तरुणांनी डीजे आणि बँड पथकातील व्यक्तींना मारहाण करत तोडफोड केल्याचा आरोप मिरवणुकीच्या आयोजकांनी केला आहे. तर गावात आमच्या नेत्यांचे पोस्टर फाडल्याने हा वाद सुरू झाल्याचे दुस-या गटातील लोकांचे म्हणणे आहे.

दोघांची प्रकृती गंभीर
सदरच्या घटनेत आतापर्यंत २० ते २५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाद होण्यापूर्वी दोन्ही समाजातील नागरिकांनी एकमेकांना दुर्गादेवीच्या महाप्रसादामध्ये जेवण करण्यासाठी निमंत्रित केले होते. मात्र संध्याकाळी मिरवणूक सुरू होताच डिजेवर गाणे लावण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवला आणि प्रचंड दगडफेक झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR