22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमुख्य बातम्यादुश्मन एकत्र येतात, तर आम्ही का नाही?

दुश्मन एकत्र येतात, तर आम्ही का नाही?

राज ठाकरेंच्या स्फोटक विधानामुळे राजकीय समिकरणांना ‘तडका’

मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातली. पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. तरीही या दोघांच्या एकत्र येण्याचा विषय अधून-मधून राजकारणात येतोच.

आता दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दावर त्यांचे मौन सोडले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने जबरदस्त ‘तडका’ बसला आहे. अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हे स्फोटक विधान केलं आहे.

एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. राज ठाकरे हे सडेतोड बोलतात. त्यांनी एक बेधडक वक्तव्य केले. उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असल्याचा घणाघात त्यांनी घातला. यामध्ये काही आतले आणि काही बाहेरचे लोक आहेत. हे सगळेच जण प्रयत्न करत आहेत. माझ्याकडून मी अलर्ट असतो. कोण काय बोलतो हे मला कळतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांनी ही कोण मंडळी आहे, याकडे इशारा जरूर केला आहे.

जगातील दुश्मन एकत्र येतात. वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येत असतील. तर आम्ही दोघांनी एकत्र येण्यावर चर्चा तर हवी, असे राज ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या वक्तव्याने आता उद्धव सेना आणि मनसे यांच्यात चर्चा होईल का? ते दोघे एकत्र येतील का? हा खल कायम आहे. कारण निवडणुकीत दोघांचे पण उमेदवार अनेक ठिकाणी आमने-सामने आहेत.

उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते. पण भाऊ वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला. पण राज ठाकरे यांनी एक सुरूवात केली आहे. त्याला ठाकरे सेनेतून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR