लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा अस्वस्थ आहे. त्यांना जगायचंं कसं, असा प्रश्न पडला आहे. अशा काळात सरकार दुष्काळग्रस्तांसाठी विशेष पॅकेज जाहीर करेल, अशी आशा होती. पण, आजच्या अर्थसंकल्पात तसे न झाल्याने दुष्काळग्रस्तांच्या पदरी निराशा आली आहे, अशी भावना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त्त केली.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर झाला. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर झाला. अनेक नव्या घोषणा करण्यात आल्या. पण, मुख्य प्रश्न सर्वांसमोर उभा आहे तो राज्यातील दुष्काळाचा. याचाच सरकारला विसर पडल्याचे दिसून आले, असे सांगत आमदार धिरज देशमुख यांनी दुष्काळाच्या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधून घेतले.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, वेगवेगळ्या योजनांसाठी निधी जाहीर करण्यात आला. मग दुष्काळग्रस्तांसाठी विशेष पॅकेज का नाही? अर्थसंकल्प सादर करीत असताना ‘दुष्काळग्रस्तांना सवलती दिल्या’, असे मोघम सांगण्यात आले. हे विधान म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ टाकण्यासारखे आहे. कारण प्रत्यक्षात दुष्काळग्रस्तांपर्यंत कसल्याही सवलती अद्याप पोहोचल्या नाहीत, हे वास्तव आहे.
सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी निधी जाहीर केला नाही
विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. पण, मराठवाड्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी एकाही रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली नाही. केवळ प्रगतीपथावर असलेल्या मराठवाड्यातील कामांची नावे सांगण्यात आली. विदर्भाप्रमाणे मराठवाड्यालाही निधी जाहीर केला असता तर इथल्या सिंचनाचे अनेक प्रश्न मार्गी लागले असते, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.
लेक लाडकी योजना अद्याप कागदावर
लेक लाडकी योजना ही पूर्वीच्याच अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. तिचा उल्लेख आज पुन्हा एकदा करण्यात आला. पण, ही योजना वर्ष उलटले तरी अद्याप कागदावरच आहे. तिचा फायदा लाभार्थ्यांना झालाच नाही, असे नुकतेच माध्यमांनी समोर आणले आहे. त्यामुळे सरकारला सर्वसामान्यांची किती काळजी आहे, हे दिसते. म्हणून हा अर्थसंकल्प निराशाजनक असाच आहे, अशी टीका आमदार धिरज देशमुख यांनी केली.
घोषणांच्या पावसाने कोणाचे हित साधणार?
राज्य सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प नेहमीसारखाच घोषणांचा पाऊस आहे. विशेष म्हणजे लोकसभेची निवडणुक काही दिवसांवर असल्यामुुळे या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा अधिक पाऊस पडला. अशा नूसत्या घोषणांनी कोणाचे हित साधरणा? सरकारने पोकळ घोषणांनी करीत सर्वच घटकांचा भ्रमनिरास केला आहे. आगामी निवडणुकीत जनता सरकारला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे ज्येष्ठ विधीज्ञ उदय गवारे म्हणाले.