पाऊस गायब झाल्याने यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे. शेतातील उभी खरीप पिके करपल्याने शेतक-यांच्या डोळ्यातून महापूर वाहत आहे. सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करण्याची आणि आर्थिक मदतीची मागणी होत आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असताना या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत मंत्री, खासदार, आमदार आणि अधिकारी काजू-बदामासारख्या सुकामेव्यावर ताव मारताना दिसले. नेत्यांच्या या असंवेदनशीलतेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवारी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर, जालनाचे खासदार कल्याण काळे, राज्यसभा खासदार रामराव वडकुते, डॉ. अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, चंद्रकांत नवघरे, बाबुराव पाटील कोहळीकर, कैलास पाटील, अमर राजूरकर आणि अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमधील पावसाची तूट, खरीप पिकांची स्थिती, पाणीटंचाई, चा-याची समस्या, शेतक-यांच्या मागण्या आणि संभाव्य उपाययोजना यावर चर्चा झाली. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे देखील ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत गंभीर चर्चा सुरू असतानाच उपस्थित लोकप्रतिनिधींच्या टेबलावरील सुकामेव्याच्या थाळ्यांचे दृश्य कॅमे-यात कैद झाले. परभणीचे खासदार संजय जाधव हे काजू-बदाम खाण्यात मश्गुल असल्याचे चित्रित झाले. हा प्रकार लक्षात येताच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तत्काळ संबंधित कर्मचा-यांना सूचना देऊन काजू-बदामाच्या प्लेट टेबलावरून हटवण्यास सांगितले, पण तोपर्यंत या प्रकाराचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बैठकीतून बाहेर आल्यावर शिंदे सेनेचे खासदार संजय जाधव यांनी वरील प्रकाराबाबत दिलेली प्रतिक्रिया संतापजनक होती.
ते पत्रकारांवरच चिडून म्हणाले, काजू-बदाम आम्ही टेबलावर ठेवले नव्हते. ही व्यवस्था प्रशासनाने केली होती. मी परभणीहून आलो, सकाळपासून नाश्ता केला नव्हता. समोर डिश ठेवल्या होत्या, त्यातील बदाम उचलून खाल्ला. एखाद्याला भूक लागली असेल आणि त्याने खाल्ले तर त्यात चूक काय? दुष्काळ आहे म्हणून कोणी काही खात नाही का? काजू-बदाम ठेवणा-यांना विचारले पाहिजे की, तुम्ही ते का ठेवले? त्यांना काही न विचारता आम्हालाच का प्रश्न विचारता? या प्रकरणात माझ्यावर टीका होत आहे, तर होऊ द्या. मी ती स्वीकारायला तयार आहे. माध्यमांनी त्यांची चिंता करू नये. तुम्ही दुष्काळावरच बोला. काजू-बदाम खाण्यावर बोलू नका! या असंवेदनशीलतेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. उबाठाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले, प्रशासकीय अधिका-यांचे हंटरने कातडे सोलून काढले पाहिजे. त्यांना काही संवेदनशीलता आहे की नाही? ज्या जिल्ह्यात बैठक होत आहे, त्याच जिल्ह्यात शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. बैठकांच्या नाटकांची गरज नाही, सरकारने सरळ दुष्काळ जाहीर केला पाहिजे.
पाणी, विजेचा अभाव आणि पिके जळून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडून तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाच्या बैठकीत बसून काजू-बदाम चघळणे म्हणजे शेतक-यांच्या दु:खाची थट्टा करण्यासारखे आहे. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार बैठकांचे सोपस्कार करत दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त शोधत आहे. शेतकरी नेते अजित नवले म्हणाले, शेतक-यांना घास गिळत नाही, सत्ताधा-यांना काजू-बदाम कसे गोड लागतात? या प्रकारावरून टीकेचा भडिमार झाल्याने सत्ताधा-यांना सारवासारव करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, एखादी बैठक असेल तर साधारणपणे प्रशासनाकडून काजू-बदाम दिले जातात. तशी पद्धत आहे, पण प्रशासनाने काही ठिकाणी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. प्रशासनाने संवेदनशील राहिले पाहिजे.
















