लातूर : प्रतिनिधी
खरेदीदारांनी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे आडत्यांना चोवीस तासाच्या आत कायद्यानुसार द्यावे, तर खरेदीदारांना लागणारी लेव्ही, शेतक-यांची आडत रद्द केल्यास चोवीस तासाच्या आत शेतमाल खरेदीचे पैसे देता येतील अशा दोन भूमिका आडते व खरेदीदारांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत मांडल्या. त्यामुळे या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शुक्रवारीही आडत बाजार सुरू होण्याच्या आशा धूसर झाल्या. लातूर बाजार समितीच्या आवारातील गेल्या तीन दिवसापासून कोटयावधी रूपयांचे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
लातूर बाजार समितीने गेल्या दोन दिवसापासून बंद आसलेला शेतमालाचा आडत बाजार सुरू करण्याच्याद्ृष्टीने गुरूवारी आडते व खरेदीदार व्यापारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनिल पडिले, आडत असो.चे चंद्रकांत पाटील, व्यापारी असो. चे पांडूरंग मुंदडा, दालमिल असो. चे हूकूमचंद कलंत्री, सचिव सतिश भोसले व संचालक उपस्थित होते. लातूर बाजार समितीच्या आवारात सर्व खरेदी व विक्रीचे व्यवहार मंगळवार दि. २ जुलै पासून बंद आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाची आडचण होत आहे. आडत बाजार सुरू करण्याच्यासाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापा-यांनी आडत्यांकडून घेतलेल्या शेतमालाचे पैसे चोवीस तासात द्यावेत, अशी मागणी आडते करत आहेत.
हा कायदा १९६७ पासून पणने लागू केलेला आहे. तसेच खरेदीदार खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे वेळेत देत नसल्याने व्यवहारावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. कांही वेळा पैसे बुडवण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे पणनच्या काद्याचे पालन होणे आवश्यक आहे. तर खरेदीदारांनीही आमच्यावर लागलेली लेव्ही व शेतक-यांची आडत रद्द करा, चौवीस तासाच्या आत पैसे देऊ अशी भूमिका मांडली. शेतमाल खरेदी केल्यानंतर व्यापा-यांनी किती दिवसात पैसे द्यायचे, याचा निर्णय गुरूवारीही बैठकीत न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. या संदर्भाने शुक्रवार दि. ५ जुलै रोजी पुन्हा बैठक होणार असून या बैठकीत तोडगा निघतो का ते पाहणे आवश्यक आहे.