सोलापूर – सोलापूर शहरातील जगजीवनराम नगर मोदी परिसर येथे राहणा-या दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली. आणखीन दोन मुलं गंभीर असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या वस्तीमध्ये राहणा-या अनेक नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे. यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झालेला आहे. दूषित पाण्यामुळे त्या मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या भागाला जोडणा-या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे. ड्रेनेज चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच आ. देवेंद्र कोठे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, माजी नगरसेवक किसन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. महापालिकेच्या अधिका-यांना यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत.