देवणी तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने जलसाठ्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. उपविभागीय पाटबंधारे कार्यालय, शिरूर अनंतपाळचे शाखा अधिकारी आर. ए. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विविध साठवण प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी अत्यल्प आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार दवण हिप्परगा लघुपाटबंधारे प्रकल्प, वडमुरंबी, गुरनाळ, आनंदवाडी, अनंतवाडी, लासोना आणि बोरोळ साठवण तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शुन्य टक्के नोंदविण्यात आला आहे
.
विशेष म्हणजे वांगदरी साठवण तलावात केवळ ९.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. दुसरीकडे, देवणी तालुक्यातील महत्त्वाच्या धनेगाव बराजमध्ये एकूण जिवंत साठा अवघा ६ टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अपु-या पावसामुळे जलसाठ्यामध्ये अपेक्षित पाण्याची आवक झालेली नाही. अनेक साठवण तलाव अक्षरश: कोरडे पडल्याने परिसरातील शेतक-यांसमोर सिंचनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता महत्त्वाची ठरणार असून, धनेगाव बॅरेजमधील केवळ ६ टक्के जिवंत साठा ही आगामी पाणीस्थितीची गंभीर सूचना मानली जात आहे.
दरम्यान, पावसाची कमतरता कायम राहिल्यास तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. साठवण तलावांमधील सध्याची आकडेवारी पाहता ‘पाणी आहे, पण पुरेसे नाही, अशीच देवणी तालुक्याची स्थिती दिसून येत आहे.
















