लातूर : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ एप्रिल रोजी देवणी येथे भव्य जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या पशुप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत नाव नोंदणी केली जाणार आहे. सकाळी ११ नंतर कोणत्याही परिस्थितीत नाव नोंदणी केली जाणार नाही. सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान पशुधन निवड केली जाईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.
प्रदर्शनातील गट- देवणी नर: १ वर्षाखालील वासरे, १ वर्षावरील वासरे, २ दात वळू, ४ दात वळू, ६ दात वळू. देवणी मादी: १ वर्षाखालील वासरे, कालवड, गाभण गाय, दुधाळ गाय. लालकंधारी नर: १ वर्षाखालील वासरे, १ वर्षावरील वासरे, २ दात वळू, ४ दात वळू, ६ दात वळू. लालकंधारी मादी: १ वर्षाखालील वासरे, कालवड, गाभण गाय, दुधाळ गाय. संकरित मादी: १ वर्षाखालील वासरे, कालवड, गाभण गाय, दुधाळ गाय. अश्व: नर, मादी. कुक्कुट: देशी कोंबडी, विदेशी कोंबडी. उस्मानाबादी शेळी: तीन किंवा त्यापेक्षा जास्त पिलांसह शेळी.
लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिका-यांचे आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक. पशुपालकांचे संमतीपत्र (रोग नसल्याबाबत) सादर करावे. प्रत्येक गटातील पशुधनास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अ, ब, क, ड अशी बक्षिसे दिली जातील. प्रत्येक गटात किमान १० पशुधनाचा सहभाग आवश्यक; अन्यथा गट रद्द होईल आणि ग्रेडनुसार बक्षिसे दिली जातील. बक्षिसाची रक्कम संगणक प्रणालीद्वारे (फळॠर) दिली जाईल; रोख रक्कम दिली जाणार नाही. आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, लसीकरण प्रमाणपत्र आणि पशुधनाचा दाखला नोंदणीवेळी सादर करावा. पशुधन दोरखंडाने बांधून पशुपालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर आणावे. निवड प्रक्रिया पारदर्शक असेल; निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. निवड समितीशी वाद घालल्यास नोंदणी रद्द होईल. सर्वोत्तम पशुधनाची (चॅम्पियन) निवड केली जाणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.