26.2 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeमहाराष्ट्रदेवी-देवतांच्या फोटोंचे घिबली म्हणजे अपमान

देवी-देवतांच्या फोटोंचे घिबली म्हणजे अपमान

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे आवाहन

मुंबई : लालबागच्या गणपती उत्सव मंडळाने सोशल मीडियावर व्हायरल होणा-या देव-देवतांच्या घिबली आर्टवर चिंता व्यक्त केली आहे. घिबली आर्टमध्ये व्यंग्यात्मक विडंबनाची शक्यता असल्याने आणि हे धार्मिक भावना दुखावू शकते म्हणून, त्यांनी गणपती आणि इतर देवतांच्या प्रतिमांचे घिबली आर्ट करू नये असे आवाहन केले आहे.

दरम्यान, सध्या सर्वांच्या फोनमध्ये, व्हॉट्सअप स्टेटसपासून ते अगदी डीपीपर्यंत दिसतात ते घिबली आर्ट फोटो. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच घिबलीचे वेड लागले आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा किंवा या आर्टचा गैरवापर करून व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गणपती व इतर देव-देवतांच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ करू नका, असे आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने केले आहे.

‘घिबली आर्ट’मधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. सर्वांमध्येच या आर्टबद्दल एक कुतुहल निर्माण झाले आहे. या कुतुहलापोटी अनेकजण गणपतीच्या छायाचित्रांचेही घिबली आर्टमध्ये रूपांतर करीत आहेत. विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व लक्षवेधी देखावे आणि मूर्तिकारांनी कल्पकतेने घडवलेल्या भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण. त्यामुळे अनेकजण मुंबईचा गणेशोत्सव ‘घिबली आर्ट’मध्ये करण्यासाठी उत्सुक असणारच आणि फक्त गणेशोत्सवच नाही तर इतर देवी-देवतांचे सण, फोटो हे घिबली आर्टमध्ये केले जात असल्याचेही समोर आले आहे.
परिणामी, कुतुहल आणि उत्सुकतेपोटी अनेकजण मुंबईच्या गणेशोत्सवातील विविध छायाचित्रे आणि विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींच्या फोटोंचे‘घिबली आर्ट’ करत आहेत, इतर देवांचेही फोटो घिबलीमध्ये करून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

त्यामुळे आता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने समाजमाध्यमांवर एक निवेदन प्रसिद्ध करत आवाहन केले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘मुंबईच्या राजाच्या सर्व भक्तांना आदरपूर्वक आवाहन! आपणा सर्वांना ज्ञात आहे की, मुंबईचा राजा आणि इतर देवता आपल्या सर्वांच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. देवतांच्या चित्रांमध्ये पवित्रता आणि पावित्र्य असते. सध्या समाजमाध्यमांवर काही लोक गणपतीच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ तयार करत आहेत, जे योग्य वाटत नाही. सर्वांना नम्र विनंती आहे की, कृपया गणपतीच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ तयार करू नये किंवा ज्यांनी तयार केले असेल, त्यांनी ते समाजमाध्यमांवरून काढून टाकावे. अशा प्रकारच्या ‘एआय’ अ‍ॅपमध्ये व्यंग्यात्मक विडंबन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे नकळतपणे आपण आपल्याच देवाचा अपमान करतो. गणपतीच्या मूर्तीचे असे रूपांतर करणे योग्य नाही’. असे म्हणत त्यांनी देवी-देवतांच्या फोटोंची घिबली करू नये अशी विनंती केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR