30 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeसंपादकीयदेशद्रोही विजय शहा

देशद्रोही विजय शहा

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री कुंवर विजय शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश मध्य प्रदेश हायकोर्टाने दिले आहेत. मध्य प्रदेश हायकोर्टाने स्वत:हून कुरेशी यांच्यावर केलेल्या विधानाची दखल घेतली व मंत्री शहा यांच्या विरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्या. अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने पोलिस महासंचालकांना बुधवारी सायंकाळपर्यंत मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच असे कृत्य पुन्हा केल्यास त्यांना न्यायालयाच्या अवमान कारवाईचा सामना करावा लागेल, असे बजावले. या प्रकरणी सरकारी महाधिवक्त्यांनी वेळ मागितला असता न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांना निर्देश जारी केले व या प्रकरणी गुरुवारी सुनावणी करण्याचे निश्चित केले. मंत्र्यांच्या वकिलाने सांगितले की, न्यायालयाचा आदेश केवळ वर्तमानपत्रातील बातम्यांवर आधारित आहे.

त्यावर न्यायालय म्हणाले की, या प्रकरणी ते अधिकृत पुरावा म्हणून व्हीडीओ लिंकचा आधार घेतील. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’चा भाग असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांची देशभर प्रशंसा झाली, अजूनही होत आहे. मात्र, त्याच कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून मध्य प्रदेशच्या भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री कुंवर विजय शहा वादात सापडले आहेत. शहा यांचे हे वादग्रस्त विधान त्यांना चांगलेच भोवले आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शहा यांच्या या विधानाची दखल घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री ११.१५ वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

इंदूर जिल्ह्यातील रायकुंडा गावात आयोजित हलमा कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री विजय शहा म्हणाले, ज्यांनी आमच्या महिलांच्या कुंकावर घाला घातला, ज्यांनी आमच्या पर्यटकांना मारले, आम्ही त्यांच्याच बहिणीला त्यांच्याकडे पाठवले आणि त्यांना ठार मारले. दहशतवाद्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले आणि मोदींनी त्यांच्या बहिणीला आमच्या विमानातून त्यांच्या घरी पाठवून त्यांना वाईट वागणूक दिली आणि इशारा दिला की, जर तुम्ही आमच्या बहिणींना विधवा केले, तर तुमच्या समुदायाची बहीण येऊन तुम्हाला धडा शिकवेल. विजय शहा यांच्या या विधानाचा संबंध थेट लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याशी आहे. शहा यांच्या याच वक्तव्याची दखल घेत उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कर्नल सोफिया यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या अडचणीत वाढ होणार हे निश्चित.

न्या. अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मध्य प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना हे आदेश दिले आहेत. याच मुद्यावरून राजकारण देखील पेटले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी मंत्री विजय शहा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशातील या मंत्र्याने लष्करातील अधिकारी आणि बहिणीचा अपमान केला आहे. त्यांना २४ तासांत पदावरून हटवले नाही तर आम्ही देशातील सगळ्या पोलिस ठाण्यांत विजय शहा यांच्याविरुद्ध तक्रार करू असे पटवारी म्हणाले. इंदूरच्या महिला काँगे्रस नगरसेवक यशस्वी पटेल यांनी विजय शहा यांचे तोंड काळे करणा-यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रसंगात अशा पद्धतीचे राजकारण करणे मंत्र्यांना शोभत नाही. अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्धच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना चांगलेच फटकारले. ‘जा आणि माफी मागा.

थोडीशी संवेदनशीलता दाखवा’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी मंत्र्यांकडून अशी विधाने अपेक्षित नसून, ती असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. संवैधानिक पदांवर असलेल्या व्यक्तींनी भाषण करताना संयम राखणे आवश्यक आहे. सरन्यायाधीश गवई यांनी शहा यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि म्हटले की, तुम्ही कोणत्या प्रकारची विधाने करत आहात? तुम्ही थोडी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. उच्च न्यायालयात जाऊन माफी मागा. विरोधी पक्ष, लष्करी माजी सैनिक आणि सत्ताधारी भाजपच्याच अन्य सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर मंत्री विजय शहा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मंत्री विजय शहा यांनी माफी मागितली आहे. मी दहा वेळा माफी मागण्यास तयार आहे.

माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले असे ते म्हणाले. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाण शहीद झाले असेही शहा म्हणाले. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारा धडक कारवाई करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले खरे परंतु प्रसिद्धीची हाव असणा-या व्यक्तींनी या संधीचा लाभ उठवण्याचा अश्लाघ्य, लाजीरवाणा प्रकार केला. तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेण्यासाठी संधिसाधू मागे राहतील कसे? काही चित्रपटनिर्मात्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या शीर्षकासाठी नोंदणी केली. वृत्तवाहिन्यांनी पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवण्यासंबंधीच्या बातम्यांचा रतीब टाकला. भाजपने याच मोहिमेला केंद्रित करून दहा दिवसांची तिरंगा यात्रा सुरू केली. शस्त्रसंधी नको असलेल्यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना व त्यांच्या कुटुंबियांना अर्वाच्च भाषेत ट्रोल केले, धमक्या दिल्या. मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर निशाणा साधला. प्रसिद्धीलोलुप व्यक्तींच्या या निर्लज्जपणाला काय म्हणाल?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR