बीड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदर पसरणार असल्याचे स्पष्ट केले.
सकाळी मस्साजोग येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले असून, मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या सहका-यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी अद्याप फरार असून, सुदर्शन घुले याचा मोबाईलही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणाच्या तपासाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘देशमुख कुटुंबाच्या दु:खाची कल्पनाही करता येणार नाही. त्यांच्या आई आणि बहिणींच्या वेदना पाहून मन सुन्न होत आहे. हा राजकारणाचा विषय नाही, तर माणुसकीचा मुद्दा आहे. या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. ७० दिवस झाले तरी न्याय मिळत नाही, हे दुर्दैवी आहे.’’
तसेच, त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, ‘महाराष्ट्रात माणुसकी विसरली आहे का, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. मला मुख्यमंत्र्यांबद्दल मतभेद असले तरी देवेंद्रजींकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून आठ दिवसांत न्याय मिळवून द्यावा, अशी माझी अपेक्षा होती. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणा-या महाराष्ट्रात अशा
गुन्हेगारीला थारा मिळू नये.’
सुप्रिया सुळे यांनी बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही रोखठोक भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, ‘मी कुणालाही भेटणार नाही, मी कुणाकडूनही मॅनेज होणार नाही. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बीडमधील सत्तेची आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. बीडमधील गुंडगिरी थांबलीच पाहिजे.’ त्यामुळे या प्रकरणावर आता सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.