सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाचा निर्णय
बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला आता बीड जिल्हा सत्र न्यायालयात चालवला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयात चालवला जावा, असा विनंती अर्ज करण्यात आला होता. यासाठी काल बीडच्या न्यायालयात दोन्ही पक्षाचे वकील हजर होते. युक्तिवादानंतर आज याचा निकाल न्यायालयाने दिला. त्यामुळे आता हा खटला बीड जिल्हा सत्र न्यायालयात चालणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी जवळपास १५०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले. यामध्ये धनंजय मुंडे यांचा उजवा हात असणारा वाल्मिक कराड आरोपी क्रमांक १ आहे. त्याचा भाऊ विष्णू चाटेला आरोपी क्रमांक दोन केले. दरम्यान, ज्या वॉचमनला अवादा कंपनीच्या गेटवर मारहाण झाली, त्यांनी आपले जबाब नोंदवले. या तिघांनी दिलेले जबाब महत्त्वाचे ठरले असून सोनवणे यांनी सुदर्शन घुले याला काय शिवीगाळ केली, याबाबत आपल्या जबाबात माहिती दिली.
या प्रकरणी अवादा एनर्जी प्रकल्पावरील तीन वॉचमनचा जबाब महत्त्वाचा ठरला. अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे हे तिघे आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते. या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आला. यावेळी सुदर्शन घुलेने या वॉचमनना मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने या प्रकरणात अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंद आहे.