निलंगा : प्रतिनिधी
निलंगा नगर परिषदेची ही निवडणूक लातूर विरुद्ध निलंगा किंवा देशमुख विरुद्ध निलंगेकर, अशी नाही तर ती सामान्य निलंगेकरांची आणि त्यांच्या प्रश्नाची आहे, त्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. त्यामुळे भाजपच्या भूलथापांना थारा न देता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २० नोव्हेंबर रोजी निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
गुरुवार माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा येथे जाऊन निलंगा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या निवासस्थानी, नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे, पक्ष निरीक्षक विजय देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजित नाईकवाडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, अजित माने, सुधाकर पाटील, अजित निंबाळकर, अॅड. नारायण सोमवंशी, पंकज शेळके, लाला पटेल, शकील पटेल, इस्माईल लदाफ, अंबादास जाधव, डॉ. विलास लोभे, झटींग म्हेत्रे, बालाजी गोमसाळे, अरविंद भातंब्रे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
निलंगा नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढत आहे. नगराध्यक्ष पद आणि नगरसेवकांसाठी उमेदवारांची निवड करताना सर्वसहमतीने, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जनतेच्या प्रश्नाला न्याय देत निलंगा शहराच्या सर्वांगीण विकासचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने सर्व काँग्रेसजण
कामाला लागले आहेत. त्यामुळे यावेळी निलंगा नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकेल, असा विश्वास माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
निलंगा नगरपरिषदेसाठी काँग्रेस पक्षाने प्रमाणिक, होतकरू, कर्तुत्वान, लोकाभिमुख उमेदवारांची निवड केली आहे. हे करताना सोशल इंजिनिअरिंग उत्तम पद्धतीने जपण्याचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेस पक्षाची ही सर्वात जमेची बाजू आहे. आज सकाळी निलंग्यात येऊन सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि पक्षाच्या उमेदवारासमवेत चर्चा केली. तेंव्हा सर्वांच्या चेह-यावर जिंकण्याचा आत्मविश्वास दिसून आला. या निवडणुकीची काँग्रेस पक्षाकडून सुरुवातच जोरदार झाली असल्यामुळे शेवटी ही विजयाने होणार याची खात्री असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष पद आणि नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक होती, त्यामुळे सर्व समाज घटकांना न्याय देत लोकाभिमुख उमेदवार निवडीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले होते. त्यात पक्ष पातळीवरून कोणताही हस्तक्षेप करण्यात आला नाही. उमेदवार निवडीत काँग्रेस पक्षाने घेतलेली आघाडी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षातील मंडळीच्या मनात धडकी भरली आहे. त्यामुळेच या निवडणुकीला निलंगा विरुद्ध लातूर किंवा देशमुख विरुद्ध निलंगेकर, असा रंग देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाल्याचे दिसते आहे. अफवा तंत्राचा वापर करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न भाजपाच्या लोकांकडून नेहमीच होतात, हे आता जनतेनेही ओळखले आहे. त्यामुळे भाजपाच्या भूलथापा, अफवा तंत्राला जनता थारा देणार नाही, असा विश्वासही आमदार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
निलंगा शहराचा जो काही विकास झाला आहे तो यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यकाळातच झालेला आहे. त्यात भाजपच्या सत्ताधारी मंडळींनी कोणतीही भर घातलेली नाही. त्यामुळे वाढत्या निलंगा शहरात आज नागरिकांना पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ही परिस्थिती बदलून निलंगा शहराला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे.
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी मुख्यमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळातील सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण निलंग्यातील जनतेला आज हवे आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजित नाईकवाडे, काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख आणि नगरसेवक पदाचे काँग्रेस उमेदवारांना जनतेने आशीर्वाद देऊन विजय केल्यास ते सर्वजण मिळून निलंगा शहराला विकसित शहर म्हणून नवी ओळख निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले.

