22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रदेशमुख, सूर्यवंशी हत्येची आता न्यायालयीन चौकशी

देशमुख, सूर्यवंशी हत्येची आता न्यायालयीन चौकशी

मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. ताहिलियानी यांच्या एकसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती सरकारने केली तर परभणी येथील घटना व सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणांची न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. एल. आचलिया करणार आहेत. या चौकशी समितीचा अहवाल तीन ते सहा महिन्यात सादर होईल, अशी अपेक्षा आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण राज्यभर गाजत आहे. या दोन्ही प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार राज्य सरकारने दोन्ही प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. एल. ताहिलियानी यांच्या एकसदस्यीय चौकशी समितीमार्फत होईल. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. एल. आचलिया यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या दोन्ही समितींना कोणाही व्यक्तीला चौकशीसाठी बोलाविण्याचे अधिकार असतील.

न्या. तहिलियानी समितीकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणी घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे व परिणाम यांचा अभ्यास करण्यात येईल. या घटनेसाठी कोणी व्यक्ती अथवा संस्था प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार होती का, याचा तपास करण्यात येईल. अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलिसांनी करावयाच्या उपाययोजनादेखील समिती सुचविणार आहे.

३ ते ६ महिन्यांत
मिळणार अहवाल
न्या. आचलिया समिती १० डिसेंबर रोजी परभणीत घडलेला हिंसाचार तसेच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार आहे. ही समितीदेखील असे प्रकार घडू नयेत यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. पुढील तीन ते सहा महिन्यात समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR