लातूर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान लिहिताना १८ तासापेक्षाही जास्त अध्ययन, लिखाण व चिंतन करीत असत. या उपक्रमामुळे तुमची अभ्यासाकरिता लागणारी शारीरिक क्षमता, चिकाटी, जिद्द वाढणार आहे. त्यामुळे अभ्यास हा देशसेवेसाठी, महापुरुषांच्या विचारांचा अभ्यास आवश्यक आहे म्हणून तो प्रत्येकांनी नियमितपणे करावा, असे प्रतिपादन कृषि महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
कृषि महाविद्यालय, लातूर येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवांतर्गत दि. ११ एप्रिल रोजी १८ तास अध्ययन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन सकाळी ६ वाजता संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चाकुरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे व मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमास कृषि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थीनी व विद्यार्थांनी सहभाग नोंदवला आहे. महाविद्यालयात २१ वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे.
आपण विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी १८ तास अध्ययन उपक्रम राबवत आहोत, असे सांगून डॉ. ठोंबरे म्हणाले की, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आज या उपक्रमात सहभाग घेतला त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागेल व हीच सवय त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात अत्यंत उपयोगी ठरेल. प्रास्ताविकपर मार्गदर्शनात डॉ. संतोष कांबळे म्हणाले की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून अभ्यास हा केवळ एकच दिवस करायचा नसून विद्यार्थ्यांनी सातत्याने अधिकाधिक वेळ अध्ययन करून स्वत:चे, कुटुंबाचे, देशाचे नाव उज्वल करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी तर आभार डॉ.अजित पुरी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेश शेळके, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. अनिलकुमार कांबळे, भगवान कांबळे, सुधीर सूर्यवंशी, सुधीर सदार, देविदास चामणीकर, वैभव कदम, सोमनाथ बेद्रे, यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.