23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeलातूरदेशाचा विकास साधण्याची क्षमता काँग्रेस पक्षातच

देशाचा विकास साधण्याची क्षमता काँग्रेस पक्षातच

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेसने आजवर देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. या पुढेही देशाचा विकास साधण्याची क्षमता काँग्रेस पक्षातच आहे. वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढती असुरक्षितता यावर मात करून सर्वसामान्यांना, तरुणांना, महिलांना, शेतक-यांना न्याय देण्याचे काम काँग्रेसच करू शकतो त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आपल्या उमेदवाराला भरभरून आशीर्वाद द्यावा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणावर लातूर तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा रविवार, दि. १० मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार धिरज देशमुख यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार धिरज देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्ष संयमी, सुसंस्कृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानणारा पक्ष आहे. महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे. संविधानाला मानणारा, लोकशाहीचे रक्षण करणारा, लोकांचे अधिकार टिकवून ठेवणारा आणि विकासाचा ध्यास घेतलेला हा पक्ष आहे.

जागे होऊया, देशाचे भविष्य उज्ज्वल करूया
सध्याच्या सरकारने ४०० रुपयांचा सिलेंडर १२०० रुपयांवर नेला, ६० रुपयांचे पेट्रोल १२० रुपयांवर नेले. वर्षाला २ कोटी रोजगार देण्याऐवजी २ कोटी बेरोजगार निर्माण केले. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी उत्पादन खर्च दुप्पट केला. शेतक-यांना हक्काचा हमीभाव न देता २ हजार रुपयांवर बोळवण केली जात आहे. ही व्यवस्था बदलायची आहे. तेव्हा सर्वांनी जागे होऊन काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार धिरज देशमुख यांनी केले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, ट्वेन्टीवन शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक श्रीपती काकडे, सर्जेराव मोरे, जगदीश बावणे, सुनील पडिले, धनंजय देशमुख, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, अनुप शेळके, रवींद्र काळे, दैवशाला राजमाने, मदन भिसे, ईश्वर चांडक, अनिल पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, राजकुमार पाटील, सुभाष घोडके, गणेश सोमासे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR