छत्रपती संभाजीनगर : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी येथे भाजपच्या अधिवेशनात काल केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेची राज्यभरात चर्चा होत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांना बीड आणि परभणी हत्ये प्रकरणावर तुम्ही बोलायला हवे होते,असे म्हणत टोला लगावला.
लोकशाहीमध्ये कोणीही कोणाबद्दल बोलू शकतो, टीका करू शकतो. परंतु राज्यात आणि देशात गेल्या ३५ दिवसांपासून ज्या बीड आणि परभणीतील हत्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा विषयावर देशाच्या गृहमंत्र्यांनी अवाक्षरही काढू नये याचे आश्चर्य वाटते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात येऊन केंद्रीय गृहमंत्री भाषण करतात आणि हेडलाईन शरद पवार, उद्धव ठाकरे यांची होते. यावरून या नेत्यांचे महत्त्व लक्षात येते.
कायदा व सुव्यवस्था धोक्यात
महाराष्ट्रातील जनतेने एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात बहुमत आणि यश दिले, तर मग तुम्ही महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था आणि परभणी-बीड येथील हत्या प्रकरणावर दोन शब्द बोलले असते तर निश्चितच महाराष्ट्राला, पीडित देशमुख, सूर्यवंशी कुटुंबाला दिलासा आणि आधार मिळाला असता, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.