25.4 C
Latur
Saturday, February 15, 2025
Homeदेशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट-अप रेल्वे पूल तयार

देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट-अप रेल्वे पूल तयार

पांबन पूल । ब्रिटीशकालीन पुलाची नव्याने निर्मिती, रामेश्वरम्ला जाणा-या भाविकांना दिलासा

 

पांबन : वृत्तसंस्था
भारतीय रेल्वेने तामिळनाडूमधील समुद्रातील पांबन येथील ब्रिटीशकालीन पुलाची नव्याने निर्मिती केली आहे. या व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पुलाचा नवा अवतार आता प्रवाशांना पाहायला मिळणार आहे. याची हायड्रॉलिक लिफ्ट नव्याने बांधली आहे. पुलाचा मधला भाग वर उचलून घेण्याची (व्हर्टिकल लिफ्ट) रचना असलेला हा रेल्वेपूल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम नमूना आहे.

तामिळनाडू येथील मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटाला जोडणारा हा व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पुल १११ वर्षे जुना आहे. या पुलाची नवीन लिफ्ट बांधून पूर्ण झाल्यामुळे रामेश्वरम तीर्थक्षेत्राला भेट देणा-या भाविकांसह स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जुन्या पुलाशेजारीच नवा पूल उभारण्याचे नियोजन रेल्वेने केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१९ मध्ये नव्या पांबन पुलाची पायाभरणी झाली होती. आधुनिक इंजिनीअरिंगचा आविष्कार असलेला नवा पूल २,०७० मीटर लांबीचा आहे. यासाठी ५३५ कोटी रुपये खर्च आला आहे.

उंच जहाजांना पुलाखालून जाता यावे यासाठी या आधुनिक धर्तीच्या व्हर्टिकल लिफ्ट पुलाची ब्रिटीशांनी निर्मिती केली होती. जुना पुल कमकुवत झाल्याने तो डिसेंबर २०२२ मध्ये बंद केला होता. त्यामुळे रामेश्वरला जाण्यासाठी भाविकांना रस्ते मार्गाने जाण्याचा एकमेव पर्याय उरला होता.

जुना पूल लिफ्ट करण्यासाठी १६ व्यक्तींची गरज लागत होती. या कामासाठी सुमारे अर्धा तास लागत होता. मात्र नव्या पुलात जहाजांना खालून जाता यावे यासाठी मधला भाग वर उचलण्यासाठी अवघे साडेपाच मिनिटे लागणार आहेत. या कमी वेळेत ७२ मीटर लांबीचा भाग (स्पॅन) खाली-वर करणे शक्य झाले आहे. हा मधला भाग रेल्वेरुळांपासून सुमारे १७ मीटरपर्यंत वर उचलता येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR