मुंबई : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या तसेच आपल्या कामाने छाप पाडणा-या मोजक्या १०० महान व्यक्तींची यादी शुक्रवारी प्रकाशित झाली असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुस-या स्थानावर कायम आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ६व्या क्रमांकावर स्थिर आहेत. गेल्यावर्षीच्या यादीतही तिघे याच स्थानी होते. तथापि, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षीच्या ५० व्या स्थानावरून थेट १३ व्या स्थानी झेप घेतली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे या बंधूंचा मात्र या महत्त्वाच्या शंभर नेत्यांच्या यादीत समावेश झालेला नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यादीत नवव्या स्थानी दिसत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांना पुष्कळ मागे म्हणजे ७७ व्या स्थानी टाकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे ५७ व्या स्थानी आले आहेत. ‘मातोश्री’च्या ठाकरेंना मागे सोडून स्वत:चा राजकीय मार्ग प्रशस्त करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत ५१ व्या स्थानी दिसत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव सहन केला आणि नंतरच्या ६ महिन्यांतच त्यांनी तितकाच मोठा विधानसभा विजय मिळवला. महायुतीने २३५ जागांचे अतिप्रचंड असे बहुमत विधानसभेत मिळवले. त्यात भाजपाचे १३५ आमदार आहेत. देश स्तरावर त्यांच्या नेतृत्वाची दखल घेतली जाण्याचे हे एक प्रमुख कारण दिसते. त्याचबरोबर महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीचा मोठा ओघ त्यांनी आणला. राज्याला एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महायुतीच्या धडपडीची दखल देशात घेतली गेली आहे. मुंबई पालिकेच्या येणा-या निवडणुका हे मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे.
गेल्या वर्षी देशातील १८ वे महत्त्वाचे नेते म्हणून अरविंद केजरीवाल यांची नोंद झाली होती. त्यावेळी त्यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष मोदींना आव्हान देऊ शकेल असेही मानले जात होते, पण दिल्लीतील पराभवानंतर तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांत तुरुंगवारी घडल्यानंतर केजरीवाल यांची यादीतील घसरण थेट ५२ व्या स्थानावर झाली आहे
चंद्राबाबू नायडूंचा प्रथमच समावेश
फडणवीसांपाठोपाठ चंद्राबाबू नायडू यांचा १४ वा क्रमांक आहे. त्यांचे नाव अशा महत्त्वपूर्ण नेत्यांच्या यादीत प्रथमच घेतले गेले आहे. आंध्र प्रदेशाला २०४७ पर्यंत सुवर्णाध्र बनवण्याची योजना आखून चंद्राबाबू कामाला लागले आहेत. अवघ्या दीड वर्षापूर्वी त्यांची राजकीय स्थिती बिकट होती. त्यातून टीडीपी पक्षाला बाहेर काढून त्यांनी वायएसआरसीपी पक्षाला हरवले. भाजपा व जनसेवा पक्षाबरोबर युती करून आंध्रात विजय मिळवला.