मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे. त्याचप्रमाणे देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिदी भाषेचा पर्याय आहे. संपर्कसुत्राची भाषा म्हणून लोकांनी हिदी भाषा शिकली पाहिजे असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचं समर्थन केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतंच शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’ नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. या नव्या शैक्षणिक धोरणाला विरोध होऊ लागला आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचे समर्थन केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण यापूर्वीच नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं आहे. त्यामुळे यात कुठलेही नवीन निर्णय घेतलेले नाहीत. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, हा आपला आग्रह आहे. तसेच देशात एक संपर्कसुत्र तयार करण्यासाठी हिंदी ही एक भाषा आहे जी संपर्कसुत्राची भाषा होऊ शकते. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे, अशा प्रकारचा यात आमचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, कोणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्यांना इंग्रजी शिकता येईल. अन्य कुठल्या भाषा शिकायच्या असतील तर इतर भाषा शिकण्यापासून कोणलाही मनाई नाही. सर्वांना मराठी आली पाहिजे. तसेच आपल्या देशातील इतर भाषासुद्धा आल्या पाहिजेत. याबाबत केंद्र सरकारने विचार केला आहे. आपल्या देशात संपर्काची एक भाषा असावी असा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी हा प्रयत्न केला आहे.