नवी दिल्ली : प्रतिनिधी
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे २०२४-२५ च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. विक्रमी अन्नधान्य उत्पादन घेतल्याबद्दल त्यांनी देशातील शेतक-यांचे आभार मानले.
डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात झालेल्या उत्साहवर्धक वाढीचे त्यांनी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘डाळींमध्ये आत्मनिर्भरता अभियान’मुळे डाळींचे उत्पादन वाढण्यास मोठी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत भारतात अन्नधान्य उत्पादनात सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. अन्नधान्य उत्पादन २०१५-१६ मधील २५१.५४ दशलक्ष टनांपासून १०६ दशलक्ष टनांनी वाढून आता ३५७.७३ दशलक्ष टन झाले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कृषी क्षेत्रातील जलद वाढीचे प्रतिबिंब आहे.
केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितले की, तांदळाचे उत्पादनही १५०१.८४ लाख टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या १३७८.२५ लाख टनांपेक्षा १२३.५९ लाख टन जास्त आहे. गव्हाच्या उत्पादनानेही विक्रमी वाढ नोंदवली असून ते ११७९.४५ लाख टन झाले आहे. जे गेल्या वर्षीच्या ११३२.९२ लाख टनांपेक्षा ४६.५३ लाख टनांनी वाढले आहे. मूग उत्पादन ४२.४४ लाख टन, सोयाबीन १५२.६८ लाख टन आणि भुईमूग ११९.४२ लाख टन झाले आहे.
मका आणि ‘श्रीअन्न’ (भरड धान्ये) यांचे उत्पादन अनुक्रमे ४३४.०९ लाख टन आणि १८५.९२ लाख टन होण्याचा अंदाज आहे जे गेल्या वर्षी अनुक्रमे ३७६.६५ लाख टन आणि १७५.७२ लाख टन होते. तेलबिया उत्पादनात झालेल्या जोरदार वाढीबद्दल समाधान व्यक्त करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, २०२४-२५ मध्ये एकूण तेलबिया उत्पादन विक्रमी ४२९.८९ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जो २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या ३९६.६९ लाख टनांपेक्षा ३३.२० लाख टनांनी जास्त आहे.
चौहान यांनी तूर, उडीद, हरभरा आणि मूग यांच्या किमान आधारभूत किमतीच्या खरेदीच्या आश्वासनावरही प्रकाश टाकला आणि या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा देशभरातील बहुसंख्य शेतक-यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. सरकार शेती आणि शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रभावी प्रयत्न करत राहील, असेही त्यांनी सांगितले.

