34.7 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeमहाराष्ट्रदेशासह राज्यात उष्णतेची लाट, शाळांच्या वेळेत बदल

देशासह राज्यात उष्णतेची लाट, शाळांच्या वेळेत बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशासह राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून ‘हीट व्हेव’ अर्थात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेचा मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे आता अनेक राज्यांमध्ये शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून आठ राज्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने वाढती उष्णता आणि हवामान खात्याच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. भोपाळमधील सर्व शाळांना दुपारी बारापर्यंतच शाळा सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. ओडिशामध्ये देखील शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, राज्यात आलेली उष्णतेची लाट लक्षात घेता येतील शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरवल्या जाव्यात असा आदेश तेथील सरकारने दिला आहे. त्यामुळे ओडिशामध्ये आता शाळा या फक्त सकाळच्या सत्रात साते ते नऊ या वेळेतच सुरू राहणार आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून देखील २८ मार्च रोजी नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटिसीद्वारे शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व शाळा या सकाळी ७ ते ११:१५ पर्यंतच सुरू ठेवाव्यात, हा नियम सर्व शाळांसाठी लागू असेल असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेत थंड पाण्याची सोय करा, तसेच त्यांना हंगामी फळं आणि भाज्या खाण्यासाठी प्रोत्साहन द्या असे देखील शिक्षण विभागाने म्हटले आहे.

तेलंगणामध्ये देखील प्रचंड उष्णता आहे. तेलंगणाच्या शिक्षण विभागाकडून २४ एप्रिलपासून ११ जूनपर्यंत शाळांना सुटीची घोषणा करण्यात आली आहे. तेलंगणासह इतर राज्यांमध्ये देखील शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान पुढील काळात उष्णता आणखी वाढू शकते. मे महिन्यात उन्हाचा कडाका आणखी वाढेल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR