लातूर : प्रतिनिधी
लातूर पोलिसांनी लातूर जिल्हाभरात रविवार दि. १८ मे रोजी मासरेडचे आयोजन करुन हातभट्टी दारु तयार करणा-या अड्ड्यांवर, देशी-विदेशी दारुची अवैध विक्री करणा-यावर छापेमारी करण्यात आली. या प्रकरणी एकुण ५१ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परत रविवारी पहाटे मासरेडचे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणा-या ठिकाणावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारु तयार करणारे, देशी-विदेशी दारुची अवैध विक्री व्यवसाय करणा-या ५१ लोकांवर ५१ गुन्हे दाखल करून २ लाख ३४ हजार २७ रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीच्या मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी २५ पोलीस अधिकारी, ११० पोलीस अमलदारांचे विशेष पथके बनवून राबविण्यात आलेल्या मासरेडमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून- छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणा-यावर तसेच देशी-विदेशी मद्याची अवैद्य विक्री व्यवसाय करणारे ५१ इसमावर ५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हातभट्टी, हातभट्टीचे रसायन, हजारो लिटर देशी व विदेशी दारू असा एकूण २ लाख ३४ हजार २७ रुपयांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारु व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांची सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसाकडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.