22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरदोन एकर माळरानावर उभारतेय ‘वसुंधरा पार्क’

दोन एकर माळरानावर उभारतेय ‘वसुंधरा पार्क’

लातूर : प्रतिनिधी
वृक्ष लागवड आणि संवर्धन या कार्यात गेल्या एक दशकापासून कार्यरत असलेल्या वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने औसा तालुक्यातील तांबरवाडी येथे माळरानावर २ एकर मध्ये ‘वसुंधरा पार्क’ उभारली जाते आहे. यासाठी युवा शेतक-याने साथ दिली आहे. ११०० विविध पर्यावरण पूरक आणि फळझाडांची लागवड पहिल्या टप्प्यात करुन याचा प्रारंभ करण्यात आला.
वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचे कार्य केले जाते आहे. शाळा, महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थांना सोबत घेऊन वृक्ष चळवळ अधिक गतिमान केली जाते आहे. लातूर जिल्ह्यात विविध वृक्षांची एक पार्क असावी, जेणेकरुन भविष्यात हे स्थळ पर्यटन स्थळ व्हावे हे ध्येय घेऊन वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने तांबरवाडी येथे ही पार्क उभारली जाते आहे. या पार्कमध्ये पेरु, आंबा, सीताफळ, जांभूळ, आवळा, चिंच, बदाम या फळझाडांसह बांबू, करंज, चाफा, कडुनिंब, अर्जुन, आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड केली जात आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेतकरी दीपक नेलवाडे, सागर पेटकर, उमाकांत पेटकर यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा. योगेश शर्मा, रामेश्वर बावळे, अमोल स्वामी, डॉ. अजित चिखलीकर, राहुल माशाळकर, उमेश ब्याकोडे, वैभव वाघ, विकास धावारे आदींनी पुढाकार घेतला.
वसुंधरा प्रतिष्ठान इथे फळझाडे आणि इतर पर्यावरण पूरक झाडांची लागवड करून पार्क उभारत आहे. या उपक्रमासाठी झाडे आणणे, गाडीत भरणे, गाडीतून उपक्रम स्थळी उतरविणे, झाडे लागवड करण्यासाठी खड्डे घेणे ही सगळी कामे वसुंधरा टीम सदस्य गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने करीत आहे. १५ दिवस श्रमदान करुन ११०० खड्डे येथील शेतकरी बांधवांच्या मदतीने घेण्यात आले. काळया आईचे ऋण फेडण्यासाठी आणि वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे कार्य करीत राहू असा निर्धार वसुंधरा टीमने केला आहे.
दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत चालल्याने शुद्ध हवा मिळत नाही. यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. कडुंिनब हे झाड आयुर्वेदिक असून ऑक्सिजन जास्त प्रमाणात देते. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने लातूर तालुक्यातील एकुर्गा गावात श्रीकांत इंगळे पाटील यांच्या शेत बंधा-यावर ३०० कडुनिंबाची लागवड करून ऑक्सिजन पार्क उभारला. लातूर जिल्ह्याची शुद्ध हवेची गरज ओळखून अनेक ठिकाणी असे ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR