पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारा पाकिस्तानला एकामागून एक दणके दिले. या दणक्यांमुळे पाकिस्तानची होत असलेली ससेहोलपट पाहणे, ऐकणे हा रोमांचकारी अनुभव होता. याच कालावधीत भारतात आयपीएलचे युद्ध रंगात आले होते. ‘युद्धस्य कथा रम्य’ असतात, असे म्हटले जात असले तरी क्रिकेट युद्ध सुरू असताना ज्या दोन कथा कानावर आल्या त्या हृदयद्रावक होत्या. पहिली कथा म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रो-हिट शर्माने कसोटी क्रिकेटला ठोकलेला रामराम आणि त्यानंतर चारच दिवसांनी किंग कोहलीने कसोटी क्रिकेटला केलेला अलविदा! आगामी इंग्लंड दौरा महिनाभरावर आला असताना हे दोन्ही दिग्गज पांढ-या जर्सीमध्ये दिसणार नाहीत. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडच्या दौ-यावर जाणार असून तेथे तो ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौ-यात भारतीय संघाला या दोन दिग्गजांची अनुपस्थिती नक्की जाणवेल. रोहित आणि विराटने टी-२० व कसोटी क्रिकेटला रामराम केला असला तरी दोघेही एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहेत.
दोघांच्याही निवृत्तीच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसणे साहजिक आहे; पण ‘जुने जाणार, नवे येणार’ ही जगरहाटी चालूच राहणार आहे. ‘राम-कृष्ण ही आले गेले, त्या विण का जग ओसची पडले?’ हा सृष्टीचा नियम आहे. हे सारे खरे असले तरी रोहित आणि विराटने केलेली भारतीय क्रिकेटची सेवा अविस्मरणीय राहील यात शंका नाही. ३८ वर्षीय रोहितने गतवर्षी टी-२० विश्वचषक उंचावल्यावर त्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर रोहित फक्त कसोटी व एकदिवसीय प्रकारात भारताचे नेतृत्व करत होता मात्र न्यूझिलंडविरुद्ध भारताने मायदेशात ०-३ असा पराभव पत्करला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिका १-२ अशा फरकाने गमावली. या दोन्ही मालिकांमध्ये कर्णधार व फलंदाज म्हणून रोहित सपशेल अपयशी ठरला तसेच वेगवान गोलंदाजांसमोर तो चाचपडताना दिसला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यातही तो अपयशी ठरला.
तेव्हापासूनच त्याच्या कसोटीतील भविष्याविषयी चर्चा सुरू झाली. जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका झाल्यानंतर त्याने एकदिवसीय प्रकारात भारताचे यशस्वी नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १२ वर्षानी चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. रोहितने २४ कसोटीत भारताचे नेतृत्व केले त्यापैकी १२ कसोटीत विजय मिळवला तर ९ कसोटी गमावल्या. रोहितने ६७ कसोटीत ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा काढल्या. त्यात १२ शतके आणि १८ अर्ध शतकांचा समावेश आहे. कसोटीत २१२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या. ‘सिक्सर किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितचा लिलया षटकार ठोकण्यात हातखंडा होता. इंग्लंड दौ-यासाठी राष्ट्रीय निवड समिती नव्या कर्णधाराच्या शोधात असल्याची चर्चा होती. आधीच रोहितने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर चारच दिवसांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्यात मोलाची भूमिका बजावणारे ‘विराट’ वादळ सोमवारी शमले. भारताचा दिग्गज फलंदाज, ‘किंग’ म्हणून ओळखला जाणारा आणि निकटवर्तीयात ‘चिकू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली त्यामुळे आठवडाभरातच देशभरातील आणि जगभरातील क्रिकेट रसिकांना दुहेरी धक्का बसला.
सोमवारी दुपारी विराटने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून १४ वर्षाच्या कसोटी कारकिर्दीला पूर्ण विराम दिला. भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून नावाजलेल्या विराटने १२३ कसोटीमध्ये ९२३० धावा काढल्या. यात ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटच्या पांढ-या पोषाखात आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यात एक वेगळाच अनुभव होता, असे विराटने म्हटले आहे. ‘रनमशिन’, ‘चेस मास्टर’, ‘भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा’ अशा विशेषणांचा धनी असलेल्या विराटने निवृत्ती जाहीर करून क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का दिला आहे. विराटने ६८ कसोटीत भारताचे नेतृत्व केले त्यापैकी ४० कसोटीत भारताने विजय मिळवला. भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणा-यांच्या यादीत विराट अव्वल स्थानी आहे. त्याच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील एका पर्वाचा अस्त झाला. त्याची धावांची भूक, चिकाटी व जिद्द कौतुकास्पद होती. ‘टिट फॉर टॅट’साठी तो प्रसिद्ध होता. विराट कसोटीतून निवृत्त झाला असला तरी चाहत्यांच्या मनात तो कायम राहील. रोहित आणि विराट निवृत्त होण्यामागे कोच गौतम गंभीरचा हात आहे, अशी चर्चा आहे.
या संबंधी कोणताही पुरावा नसला तरी गौतम गंभीरची रणनिती, नव्या संघबांधणीची त्याची मनीषा यामुळे तो अप्रत्यक्षरित्या दोन दिग्गजांच्या निवृत्तीमागचे कारण असावे, असे बोलले जाते. भारतीय संघात स्टार क्रिकेटपटूंचा भरणा होता त्यामुळे कोचचे फारसे काही चालायचे नाही. गंभीरला हे ‘स्टार कल्चर’ संपवायचे होते, असे बोलले जाते. याला हवा देणा-या काही गोष्टी घडल्या. गौतम गंभीरची कोचपदी नियुक्ती झाल्यानंतर १०० कसोटींचा अनुभव असणा-या ऑफस्पीनर आर. अश्विनने निवृत्ती स्वीकारली. आता रोहित आणि विराटने निवृत्ती जाहीर केली तर अष्टपैलू रवींद्र जडेजाही निवृत्तीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. एकूण प्रकार खरा असेल तर भारतीय क्रिकेट रसातळाला जाईल यात शंका नाही. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये एकाहून एक दर्जेदार नवोदित क्रिकेटपटूंचा असलेला भरणा पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्रिकेट मंडळाच्या अथक परिश्रमांमुळे आणि दूरदर्शीपणामुळे भारतीय क्रिकेटने हे ऐश्वर्य प्राप्त केले आहे, त्याला दृष्ट लागू नये हीच अपेक्षा.