24.1 C
Latur
Thursday, October 9, 2025
Homeलातूरदोन दिवसांत दोन शिक्षक निलंबित 

दोन दिवसांत दोन शिक्षक निलंबित 

लातूर : प्रतिनिधी
शिक्षक हे भावी पिढी तयार करण्याचे शिक्षण क्षेत्रातील संस्कार केंद्र समजले जातात. शिक्षकांचा प्रभाव मोठया प्रमाणात अनुकरणीय विद्यार्थ्यावर पडत असतो. शिक्षक जर शाळेतच आप-आपसात भांडण करून राडा करणार असतील, शाळेच्या हजेरी मस्टरवर उपस्थिती, पण प्रत्यक्षात शाळेत अनुपस्थित राहणा-या शिक्षकांच्याकडून विद्यार्थ्यांनी काय शिक्षण व संस्कार घ्यायचे, असा प्रश्न गेल्या दोन दिवसात दोन शिक्षकांना निलंबीत केल्यानंतर निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गैरवर्तन करणा-या शिक्षकावर कारवाईचा बडगा उगारल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, शिराळा येथे मुख्याध्यापक म्हणून परमेश्वर हिराचंद माळी हे अनेक दिवसापासून शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या शाळेतील सहकारी शिक्षकाबरोबर अरेराविची भाषा करणे अशा बारीक सारीक घटनेवारून दि. २८ ऑगस्ट रोजी शाळेत दुपारी ३.४५ ते ४.३० च्या दरम्यान हाणामारी झाली. यात सहकारी शिक्षकास गाल, नाक, गळयावर जबर मारहाण केल्याने पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंदही झाली. या संदर्भाने लातूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाचे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून सदर अहवाल गट शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने परमेश्वर माळी यांना बुधवारी निलंबीत केले आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल कुमार मिना हे दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हा दौ-यावर असताना त्यांनी लातूर तालुक्यातील चांडेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता या शाळेतील शिक्षक केशव शामराव गंभीरे हे गैरहजर असल्याचे दिसून आले होते. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल कुमार मिना हे दि. ७ ऑक्टोबर रोजी जिल्हा दौ-यावर असताना पुन्हा एकदा चांडेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता या शाळेतील शिक्षक केशव शामराव गंभीरे हे गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केशव गंभीरे यांना मंगळवारी निलंबीत करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात लातूर तालुक्यातील दोन शिक्षकांना निलंबीत करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR