मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या एका कवितेवरून वाद उफाळला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी संदर्भात असलेल्या कवितेवरून शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. कुणाल कामराच्या सेटची शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. ‘एमआयडीसी’ पोलिसांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता शिंदे गटातील आमदाराने कुमाल कामराला इशारा दिला आहे.
दोन दिवसांत माफी मागा. अन्यथा मुंबईत फिरू देणार नाही, अशी वॉर्निंग शिंदे गटातील आमदार मुरजी पटेल यांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध कुणाल कामरा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
आम्ही शांत बसणार नाही : उदय सामंत
कुणाल कामराच्या गाण्यावर मंत्री उदय सामंत यांनीही भाष्य केले आहे. कुणाल कामराच्या गाण्यावर आम्ही चर्चा केली. ते पूर्ण गाणे ऐकूण आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर जर कोणी बदनामीकारक गाणे तयार करायला लागले, तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिला.
याची धुलाई करू : संजय निरुपम
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आज त्याची धुलाई करू. कुणाल कामरा हा काँग्रेसच्या इकोसिस्टिमचा एक भाग आहे. एकीकडे राहुल गांधींबरोबर तो पदयात्रा करतो आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे व शरद पवारांबरोबरही दिसतो, असा घणाघात केला आहे.
हे सहन केले जाणार नाही : फडणवीस
तर या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, कुणार कामराने संविधानाचे पुस्तक दाखवून माफी मागितली पाहिजे, असे म्हटले आहे. तर कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला असून स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने २०२४ साली दाखवून दिले आहे. राज्यातील माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वरिष्ठ नेत्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. व्यंग करा, पण अपमानित करण्याचा अधिकार नाही. ते सहन केले जाणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.