24.5 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeलातूरदोन लाख शेतक-यांची ई-केवायसी रखडली

दोन लाख शेतक-यांची ई-केवायसी रखडली

लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगाम २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खातेदाराकडून संमती पत्र प्राप्त करून घेण्याच्या बरोबरच सदर शेतक-यांची ई-केवायसी करून घेण्याचे काम कृषि विभागामार्फत सुरू आहे. जिल्हयातील ४ लाख ७४ हजार ५७३ शेतक-यांपैकी २ लाख ८५ हजार ८५७ शेतक-यांची ई-केवायसी झाली आहे. तर अद्याप १ लाख ८८ हजार ७१६ शेतक-यांची ई-केवायसी होणे बाकी आहे. ज्या शेतक-यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, अशा शेतक-यांच्या खात्यावर दि. २६ सप्टेंबर रोजी अर्थसहाय्य शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खातेदाराकडून संमती पत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून कृषी विभागामार्फत सुरू आहे. ई-पिक पाहणी केलेल्या शेतक-यांची यादी ग्रामस्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यातील शेतक-यांना प्रती शेतकरी २ हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ५ हजार रुपये हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. याकरिता संमतीपत्र व आधार क्रमांक जमा करण्याचे काम सुरू आहे.
लातूर जिल्हयातील सोयाबीनला गेल्यावर्षी म्हणावा तसा उतारा आला नाही. तसेच सोयाबीनला भाव क्विंटल ५ हजार रूपयांच्या वर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक आडणीत होते. तसेच कापूस उत्पादक शेतक-यांचीही परिस्थिती अशीच राहिली. त्यामुळे शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरपर्यंत ५ हजार रूपये अर्थसाहय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर जिल्हयातील ४ लाख ७४ हजार ५७३ शेतक-यांनी २०२३ मध्ये ई-पिक पाहणी केली आहे.
अशा नोंदणीकृत शेतक-यांपैकी २ लाख ८५ हजार ८५७ शेतक-यांची ई-केवायसी झाली आहे. तर उर्वरीत १ लाख ८८ हजार ७१६ शेतक-यांची ई-केवायसी करून घेण्याचे काम कृषि सहाय्यकांच्याकडे दिले आहे. तसेच ज्या शेतक-यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, अशा शेतक-यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी अर्थसहाय्यचा निधी वर्ग केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR