मुंबई : प्रतिनिधी
एक अभिनेत्री सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही सुंदरी बॉक्स ऑफिसची क्वीन म्हणून आता ओळखली जात आहे. २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षात तिने एकानंतर एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. या अभिनेत्रीनं बॉलिवूड, टॉलिवूड असं दोन्हीकडे नाव गाजवलं आहे. तुम्ही ओळखलं का? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर रश्मिका मंदाना आहे.
रश्मिका मंदाना हिला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून फक्त ९ वर्षे झाली आहेत. एवढ्या काळात तिनं जगभरात चाहतावर्ग निर्माण केला आहे. प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये गेल्यानंतर दीपिका पादुकोण ही बॉक्स ऑफिसची क्वीन बनली होती. तिच्यानंतर आलिया भटने हा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला. पण, आता रश्मिकानं आलिया आणि दीपिकालाही मागे टाकले आहे.
‘किरिक पार्टी’मधून पदार्पण करणा-या रश्मिकाने ‘अंजनी पुत्र’, ‘चमक’ आणि ‘चलो’ सारखे चित्रपट केले. पण, ‘गीता गोविंदम’द्वारे तिला ओळख मिळाली आणि ‘पुष्पा’ सिनेमानं स्टार बनवलं. गेल्या दोन वर्षांत ‘ऍनिमल’, ‘पुष्पा २’ आणि आता ‘छावा’ या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली. या चित्रपटांमधील समान गोष्ट म्हणजे या तिन्ही सिनेमांमध्ये रश्मिका ही अभिनेत्री होती. या तिन्ही चित्रपटांनी जगभरात ३३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता तिनं थेट बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ‘सिकंदर’नंतर ती आयुष्मान खुरानासोबत ‘थामा’मध्ये दिसणार आहे.