20.2 C
Latur
Sunday, January 11, 2026
Homeमहाराष्ट्रदोरखंड बांधून एटीएम उखडले; १२ मिनिटांत रक्कम लुटली

दोरखंड बांधून एटीएम उखडले; १२ मिनिटांत रक्कम लुटली

नाशिक : एटीएम कटरने फोडून रक्कम लुटण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र नाशिकच्या सटाणा येथे चोरट्यांनी एटीएम चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी थेट जीपला दोरखंड बांधून एटीएम उखडून काढले आणि ते जीपमध्ये टाकून अवघ्या १२ मिनिटांत घटनास्थळावरून पोबारा केला.

ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातील ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने चोरट्यांनी एटीएम मशिनच उचलून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून बँकांच्या एटीएम सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या चोरीत तीन अज्ञात चोरट्यांचा सहभाग आहे. शनिवारी रात्री २ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास चोरटे जीपमधून एटीएम केंद्रावर पोहोचले. सुरुवातीला त्यांनी कटरच्या साहाय्याने एटीएमचे शटर तोडले. त्यानंतर एटीएम मशिनला दोरखंड बांधून जीप पुढे नेली. ओढताना दोन वेळा दोर तुटला, मात्र तिस-या प्रयत्नात चोरट्यांनी संपूर्ण एटीएम उखडून बाहेर काढले. पहाटे ३ वाजून २ मिनिटांनी एटीएम जीपमध्ये टाकून ते साक्रीच्या दिशेने फरार झाले.

एटीएममध्ये छेडछाड होताच दिल्लीतील मुख्यालयात अलार्म वाजला. तेथून नाशिक नियंत्रण कक्ष आणि त्यानंतर सटाणा पोलिसांना माहिती देण्यात आली. सूचना मिळताच सटाणा पोलिस अवघ्या १४ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. बँक अधिका-यांना बोलावून सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. या एटीएममध्ये एकूण ४० लाख रुपये ठेवण्यात आले होते. त्यापैकी सुमारे १४ लाख रुपये ग्राहकांनी काढल्यामुळे २५ लाख ९९ हजार ४००रुपये शिल्लक होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR