27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
HomeFeaturedदोस्ती आडून जबरदस्त कुस्ती!

दोस्ती आडून जबरदस्त कुस्ती!

फडणवीसांच्या घरी खलबते, भाजपला फुटला घाम

भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसांत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माढ्यात भाजपमध्ये मोठी दुफळी निर्माण झालेली बघायला मिळाली. ही दुफळी फक्त भाजपमध्येच नाही. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही निर्माण झाली आहे. काँग्रेस माढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे बडे नेते रामराजे निंबाळकर यांनी उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या रणसंग्रामात माढ्याचा विषय चर्चेत आहे. माढ्याच्या राजकारणात आपण अंदाजही लावू शकणार नाहीत इतक्या वरिष्ठ पातळीवर राजकीय घटना घडत आहेत.

माढा लोकसभा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा ताकद आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात या मतदारसंघात सातत्याने राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यामुळे हे राजकीय वैर इतक्या सहजासहज संपणार नाही. विशेष म्हणजे स्वत: रणजितस्ािंह निंबाळकर यांनी हे मान्य केलं आहे. पण भाजपला अजूनही आशा आहे.

रामराजे निंबाळकर यांनी उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केला आहे. त्यांनी भाजपला उमेदवार बदलण्याची विनंती केली. त्यामुळे माढ्यात सत्ताधारी महायुतीतच मोठी गुंतागुंत बघायला मिळत आहे. ही गुंतागुंत सोडवण्यासाठी आता रणजितसिंह निंबाळकर स्वत: राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत.

दरम्यान, रणजितसिंह निंबाळकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत माढ्याच्या जागेवर अवांतर चर्चा झाली. विशेष म्हणजे माढाच्या जागेवर राष्ट्रवादीकडून मदत मिळाली नाही तर बारामतीत भाजपकडून राष्ट्रवादीला मदत केली जाणार नाही, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या बैठकीनंतर राहुल कुल आणि रणजितसिंह यांनी सविस्तर भूमिका मांडली.

राहुल कुल म्हणाले…
‘‘आमच्या प्रश्नांचं निराकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत. महायुतीत चांगला समन्वय व्हावा या दृष्टीकोनाने ते आवश्यक सूचना करत आहेत. माढ्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी मदत करावी आणि बारामतीतही महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी मदत करावी, अशा प्रकारचंच कामकाज सुरु आहे. माढ्यातच नव्हे, बारामतीसह सर्व मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. दौंडची भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट केली आहे. महायुती जो उमेदवार देईल त्याचं आम्ही काम करु. त्या पद्धतीने आम्ही कामकाज सुरु केलेलं आहे. त्या ठिकाणी महायुती बळकटीने काम करेल, अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करतो’’, अशी प्रतिक्रिया आमदार राहुल कुल यांनी दिली.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले…
‘‘मतदारसंघात अडचणी कुठल्या नसतात? माढ्याच्या प्रश्नाला फक्त जास्त फोकस दिला जातोय. आम्ही प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात लढलेलो आहोत. नगरपालिकेपासून विधानसभेच्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात झालेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणच्या नाराजी ही वरिष्ठ पातळीवर मिटल्या आहेत. तर खालच्या पातळीवर टप्प्याटप्प्यातून बैठकीतून चर्चेतून मार्ग काढायचा आहे. माढा लोकसभेची जागा पूर्वी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लढवल्याने राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता जास्त असते. पूर्वी एकमेकांविरोधात झालेले संघर्ष एका क्षणात दूर होत नाहीत. ते टप्प्याटप्प्याने दूर होतील. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नेते हा संघर्ष दूर करतील’’, असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

‘‘पण ही निवडणूक राहुल गांधी पंतप्रधान बनणार की नरेंद्र मोदी? अशी आहे. ही निवडणूक फक्त माढा लोकसभा मतदारसंघापर्यंत मर्यादीत नाही. त्यामुळे समोरील उमेदवार कोण? हे महत्त्वाचं नाही. गेल्या तीन वर्षांपूर्वीपासून राष्ट्रवादी सत्तेत आहे. आताही ते महायुतीत सत्तेत आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या लोकांना सहकार्य करतात. आम्ही कोणतं काऊंटर सहकार्य करण्याची अपेक्षा नव्हती. फक्त आता निवडणुकीचा विषय आहे. महायुतीचं धोरण पाळावं, हाच त्या ठिकाणचा विषय होता, अशी प्रतिक्रिया रणजितसिंह यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR