अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत इतर देशांसोबत ‘जशास तसे’ कर धोरण राबवण्याचा निर्णय घेतला असून रेसिप्रोकल टॅक्स आकारण्याची घोषणा केली. बुधवारी त्यांनी यासंबंधीच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार भारतीय मालावर २७ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. चीनवर ३४ टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के, युरोपीय महासंघावर २० टक्के, बांगला देशवर ३७ टक्के तर थायलंडवर ३६ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी जगभरातून आयात होणा-या वस्तूंवर कर लादण्याचा आणि प्रमुख व्यापारी भागीदारांवर अतिरिक्त कठोर शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे हे शुल्क त्वरित रद्द करण्याचे आवाहन केले आहे. कारण यामुळे जागतिक आर्थिक विकासाला धोका निर्माण होईल, अमेरिकेचे हित आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीला हानी पोहोचेल असा इशारा दिला आहे. अमेरिकी वस्तूंवर भारत मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने वारंवार केला होता. भारत अमेरिकन मालावर ७० टक्के कर आकारत असल्याचा आरोप केला.
ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘अमेरिका फर्स्ट’ अभियानासाठी कर लावणे गरजेचे होते. ‘जशास तसे’ कर लावल्याने अमेरिकन तिजोरीत दरवर्षी ४३ लाख कोटी रुपयांची भर पडेल. अमेरिकेत येणा-या जवळपास सर्व वस्तूंवर किमान १० टक्के कर लादला जाईल. व्यापार तूट कमी करण्यासाठी भारतीय उत्पादनांच्या आयातीवर २६ टक्के कर लावण्यात आला आहे. भारताकडून आकारण्यात येणा-या आयात शुल्काच्या तुलनेत हा कर निम्मा आहे. भारतासह सुमारे २५ देशांवर अशाच प्रकारे आयात शुल्क लावण्यात आले आहे. आयात शुल्काची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले, आमच्यासाठी हा मुक्तिदिन आहे. दीर्घकाळापासून या दिवसाची प्रतीक्षा होती. अमेरिकन उद्योगाचा पुनर्जन्म, अमेरिकेच्या भाग्योदयाचा दिवस म्हणून २ एप्रिल २०२५ ही तारीख लक्षात ठेवली जाईल. या दिवशी आम्ही अमेरिकेला पुन्हा समृद्ध करण्याचे काम सुरू केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी कर आकारणीवरून जगाला दिलेला इशारा अखेर अमलात आणला आहे. जगातील जवळपास १०० देशांवर ट्रम्प यांनी ‘जशास तसा’ (टॅरिफ) कर लावला आहे.
या ‘कर’भाराविरोधात जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. १० टक्के टॅरिफची अंमलबजावणी ५ एप्रिलपासून तर ‘जशास तसा’ कराची अंमलबजावणी ९ एप्रिल रोजी सुरू होईल. ट्रम्प प्रशासनाने जगातील अनेक देशांवर लावलेल्या करांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल असे अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला याचा प्रथम फटका बसेल. एखादा फुटबॉलपटू स्वत:च्याच गोलपोस्टमध्ये फटका मारून सेल्फ गोल करतो, तसेच काम अमेरिकेने केले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचेच मोठे नुकसान होईल, भारतावर त्याचा किरकोळ परिणाम होईल. भारतातून निर्यात केल्या जाणा-या वस्तूंवर कर वाढल्याने अमेरिकन ग्राहकांना वस्तू महाग मिळतील. त्यामुळे मागणी कमी होईल. टॅरिफ म्हणजे एखाद्या देशातून आयात करणा-या वस्तंूवर लावलेले शुल्क. भारतातून अमेरिकेत जाणा-या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ लावले जाईल. याचा भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक प्रभाव कृषी क्षेत्रावर पडू शकेल. भारताने कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे. भारताची अर्धी लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. कृषी क्षेत्रात भारत जगातील आठव्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. तसेच सर्वांत मोठा दूध उत्पादक देशही आहे. भारत जगभरात धान्य, फळे, दुग्धजन्य पदार्थ निर्यात करतो.
भारत अमेरिकेला तांदूळ, कोळंबी, मध, एरंडेल तेल, काजू, फळे, भाजीपाला, डेअरी उत्पादने, चहा-कॉफी, कोको पावडर, मसाल्याचे पदार्थ निर्यात करतो तर अमेरिकेतून बदाम, अक्रोड, पिस्ता, सफरचंद आणि कडधान्य भारतात येते. अमेरिकेचा डोळा भारतातल्या कृषि बाजारपेठेवर आहे. याआधीही अमेरिकेने भारताची कृषि बाजारपेठ खुली करण्याची मागणी केली होती. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारतीय कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातील अमेरिकन कृषी उत्पादनावर सरासरी ३७.७ टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. अमेरिकेत भारतीय कृषी उत्पादनावर हा कर ५.३ टक्के होता. आता अमेरिकेने त्यात वाढ केली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार भारत विकसनशील देश असल्याने भारताला अधिक कर लादता येतो. पण आता ट्रम्प यांनी ‘मेक इन अमेरिका ग्रेट अगेन’ ही मोहीम हाती घेतली आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात जास्त होते तर आयात कमी होते. भारतीय शेतमालावर २६ टक्के टॅरिफ लावल्याने भारतीय वस्तू अमेरिकन बाजारपेठेत प्रचंड महाग होतील आणि त्याचा फायदा तेथील स्थानिक उत्पादकांना होईल. ट्रम्प सरकारला मोठा महसूल मिळेल आणि भारतीयांचे नुकसान होईल. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आणि दबावामुळे भारतीय कृषि बाजारपेठ खुली झाली आणि विदेशी उत्पादनावरील आयात कमी झाली तर भारतीय शेतक-यांचा टिकाव लागणार नाही.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी यांनी अमेरिकन टॅरिफ अयोग्य असल्याचे म्हटले आहे. यामुळे व्यापारयुद्ध भडकू शकते असे त्या म्हणाल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांनी टॅरिफ व्यवहार्य नाही, ते पूर्णपणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. टॅरिफला कसलाही तर्काधार नाही. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीविरोधातले हे पाऊल आहे. एखादा मित्र असे वागू शकत नाही असेही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प भारताचा उल्लेख करताना म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच इथे येऊन गेले. ते माझे फार चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही माझे मित्र असलात तरी माझ्या देशावर अन्याय करत आहात. त्यांनी आपल्यावर ५२ टक्के कर लावला आहे. त्या तुलनेत गेली कित्येक वर्षे आपण त्यांच्याकडून काहीच कर घेतलेला नाही. ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हेच दिसून येते. ट्रम्प यांना मोदी काय आणि कसे उत्तर देतील ते बघावे लागेल. तूर्त मोदी म्हणत असतील, दोस्त दोस्त ना रहा…!