भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. दोन्ही देश कराराच्या अंतिम टप्प्याजवळ पोहोचल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. भारताला अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याची इच्छा असून आता होणारा करार हा या पूर्वी झालेल्या करारांपेक्षा वेगळा असेल, असे ते म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारत दौ-यावर असून व्यापारासह ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि दोन्ही देशातील नागरिकांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा सुरू आहे. रुबियो यांनी मंगळवारी बोलताना करार अंतिम करण्यासाठी मोजकेच मुद्दे चर्चेसाठी शिल्लक असल्याचे सांगितले.
उर्वरित प्रश्न लवकर सुटल्यास कराराची घोषणा होऊ शकते आणि त्यानंतर दोन्ही देशांचे नेते त्यावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मिलवॉकी आणि वॉशिंग्टन येथे अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांची भेट घेऊन करारातील विविध तरतुदींवर चर्चा केली होती. भारत आणि अमेरिकेने फेब्रुवारीमध्ये द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याच्या आराखड्याला अंतिम स्वरूप दिल्याची घोषणा केली होती; मात्र अमेरिकेच्या शुल्कविषयक धोरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे पुढील वाटाघाटी कराव्या लागल्या. भारत-अमेरिकेतील कराराबाबत दोन्ही बाजूंकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी नवी दिल्लीतील ‘ब्ल्यूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम’मध्ये बोलताना महत्त्वाचे मुद्दे मार्गी लागले असून करार लवकरच लागू करण्याच्या दिशेने दोन्ही देश पुढे जात असल्याचे सांगितले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही चर्चेच्या निष्पत्तीबाबत आशावाद व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने रशियन निर्यातीशी संबंधित काही निर्बंध आणि शुल्क हटविण्याचा निर्णय घेत भारताला दिलासा दिला होता. ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या कायद्यानुसार हे निर्बंध आणि शुल्क लागू होणार होते;
मात्र, शुक्रवारी रात्री जारी केलेल्या कार्यकारी आदेशाद्वारे त्यांनी ग्रॅहम कायद्यांतर्गत लादलेले निर्बंध शुल्क रद्द केले. या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. व्यापार कराराबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत असले तरी कराराच्या अंतिम अटी आणि त्याचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या भारत दौ-याला मंगळवारी मुंबईत सुरुवात झाली. रुबियो आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यात मुंबईतील ताजमहल पॅलेस येथे महत्त्वाची द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत व्यापार, ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांमधील संबंधावर चर्चा झाली. बैठकीला भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना रुबियो म्हणाले, हा करार अंतिम कराराच्या अगदी जवळ पोहोचला असून काही मोजके मुद्दे बाकी आहेत त्यामुळे लवकरच कराराबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या ऊर्जा धोरणावरही रुबियो यांनी भाष्य केले.
भारताने आपल्या तेलाच्या स्रोतांमध्ये विविधता आणणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. रशियाकडून होणा-या तेल खरेदीबाबतही भारताच्या ऊर्जा गरजा लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी मान्य केले. भारताच्या तेल शुद्धीकरण क्षमतेचेही त्यांनी कौतुक केले. भारताकडे जड कच्चे तेल शुद्ध करण्याची क्षमता आहे. बुधवारी गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिफायनरीला रुबियो भेट देणार आहेत. तेथे उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींशीही ते चर्चा करणार आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर रुबियो यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेटवे ऑफ इंडिया येथे भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. या भेटीत मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती रुबियो यांना देण्यात आली. रुबियो यांच्या भारत दौ-यात व्यापार करारासोबतच ऊर्जा सुरक्षा आणि भारत-अमेरिका धोरणात्मक संबंधाना विशेष महत्त्व दिले जात आहे.
















