गंगाखेड : बेकायदेशीरपणे गुटखा व तबांखूजन्य पदार्थाची साठवणूक आणि विक्री करणा-या येथील खडकपुरा गल्लीतीतील एका मोठ्या अड्ड्यावर स्थागुशाच्या पथकाने दि.१० जून रोजी मध्यरात्री छापा टाकला. या छापेमारीत ९२ हजार २४८ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसानी या कारवाईत एकास ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्त घालत होते. यावेळी खडकपुरा गल्लीतील एका गोदामात गुटखा असल्याची माहिती समोर आली. या गुटख्याची चोरट्या मार्गाने विक्री होत असल्याची पक्की माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानंतर पथकाने वेळ दवडता २ पंचांना सोबत घेऊन मध्यरात्री २.५० वाजता संबंधित गोदामावर अचानक छापा टाकला. अचानक पडलेल्या धाडीने गोदामातील गुटखा माफीया मालक पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पोलीसानी ताब्यात घेतले. यावेळी विमल पान मसाला, राजनिवास, डायरेक्टर स्पेशल गुटखा जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, सचिन भदर्गे, माणिक वाघ, दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत, आणि चालक उत्तम हानवते यांच्या पथकाने केली.
















