मुख्यमंत्री देवगिरीवर, अजित पवारांसोबत दीडतास चर्चा
मुंबई : प्रतिनिधी
ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो मीडियावर प्रसारित झाले. या फोटोवरून देशमुख यांची किती क्रूरतेने हत्या केली, हे समोर आले असून, यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारवर आता दबाव वाढला असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा थेट देवगिरीवर दाखल झाले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. त्यामुळे मुंडे यांचा राजीनामा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवगिरीवरील बैठकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. या बैठकीत सरकारची रणनिती आणि राष्ट्रवादीचे दोन मंत्रीच अडचणीत आल्याने त्यांच्या राजीनाम्यावर खल झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेषत: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आली. याबाबत सातत्याने देशमुख कुटुंबीयांसह अवघा महाराष्ट्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता या संदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळीचे बरेच व्हीडीओ आणि फोटो समोर आले आहेत. हे पाहून एखादा राक्षसही एवढ्या क्रूरतेने हत्या करू शकत नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरकारवर दबाव
हत्येचे व्हीडीओ आणि फोटो माध्यमांवर येताच आता सरकारवर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट देवगिरी गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तब्बल दीड तास चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत खल झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.