23.4 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंची पाठराखण

धनंजय मुंडेंची पाठराखण

महंत डॉ. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावरून तीव्र संताप
बीड : प्रतिनिधी
सर्वच स्तरातून आरोपांची राळ उठत असताना राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन भगवानबाबाचे दर्शन घेतले आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. त्यानंतर धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, हे मी १०० टक्के खात्रीने सांगतो, असे महंत म्हणाले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. यावरून धनंजय देशमुख यांनी नाराजी तीव्र संताप व्यक्त केला. एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता केली, तर दिवसा मुडदे पडतील, असे धनंजय देशमुख म्हणाले.

संतोष देशमुख यांनी ज्या आरोपीला चापट मारली, त्या आरोपींवर २२ गुन्हे आहेत. एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा भीषण खून केला. एका चापटेच्या बदल्यात त्यांनी आम्हाला १० चापट मारल्या असत्या तरी चालले असते, असे म्हणत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शास्त्री महाराजांच्या वक्तव्यावरुन त्यांनी संतापही व्यक्त केला. एक चापट मारली म्हणून त्यांची मानसिकता काय झाली असेल, असे तुम्ही म्हणता, मग आज आमची मानसिकता काय झाली असेल हे समाज बघत आहे. त्याचेही उत्तर दिले पाहिजे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्­यांनी आरोपींना फाशी होणार असे म्हटले आहे. आता आम्ही त्याचीच वाट बघत आहोत, तीच आमची मानसिकता आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.

एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता तुमची असेल तर तुम्ही समाजाचे देणे लागत नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण अशी मानसिकता कोणी केली तर दिवसा मुदडे पडतील, अशा शब्दांत धनंजय देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा जातीय संघर्ष नसून १८ पगड जातीचे लोक संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे, हा जातीय संघर्ष नसून विकृती असल्याचे देशमुख म्हणाले.

प्रकाश महाजन यांचा आरोप
मीडियाच्या माध्यमातून का लक्ष्य केले जात आहे, याचा विचार धनंजय मुंडेंनी करावा. न्यायाचार्य म्हणवणा-या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले. आता धनंजय मुंडेंची बाजू घेत आहेत. डॉ. शास्त्रींनी न्याय देताना स्त्री-पुरुष असा भेद केला. त्यांनी आपली प्रतिज्ञा तोडली आणि राजकीय भूमिका घेतली, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला.
मुंडे, कराडचे समर्थन दुर्दैवी = आव्हाड
डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरून अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. मुंडे, कराड टोळीची पाठराखण ही भगवानबाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे, अशा शब्दांत आ. जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR