बीड : प्रतिनिधी
बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘स्टार प्रचारक’ म्हणून आमदार धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका, असा थेट निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवला आहे. त्यांनी केलेल्या मागणीमुळे आता विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने स्टार प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. पण त्यांनी आपल्या मतदार संघात स्टार प्रचारक म्हणून येऊ नये अशी मागणी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे.
येत्या काही दिवसांत नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. तसेच या निवडणुकीचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्टार प्रचारक म्हणून त्यांचे (धनंजय मुंडे) काम परळीतच राहावे. ते माजलगावात आले तर, वेगळ्याच प्रकारचा विपरीत परिणाम घडू शकतो, असा दावाही प्रकाश सोळंके यांनी केला आहे. परळीत मुंडे बहीण-भावांची युती होते. मग जिल्ह्यात का होत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. युती होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले. युती करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही, हे दुर्दैव आहे, असा खोचक टोलाही प्रकाश सोळंके यांनी लगावला आहे.
या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. धनंजय मुंडे यांनी युतीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट युती होऊ नये यासाठी जास्त प्रयत्न झाले, असे मला वाटते, असा गंभीर आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांवर मुंडे बंधू-भगिनी काय उत्तर देणार हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश सोळंके हे विविध आरोप करताना दिसत आहेत.

