लातूर : प्रतिनिधी
धनगर समाज अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी दि. २८ जूनपासून येथील पु. अहिल्यादेवी होळकर चौकात बेमुदत उपोषणास बसलेले चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांची प्रकृती खालावली. परंतू, या उपोषणाची शासन व प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा रोष व्यक्त करीत सकल धनगर समाजाने दि. ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पु. अहिल्यादेवी होळकर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन तब्बल ३ तास १० मिनीटे चालले. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. तीन-तीन किलो मीटरपर्यं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र हजारे व गोयकर यांचे उपोषण मात्र ठोस निर्णय होईलपर्यंत कायम सुरुच राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करुन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारी येथील चार-दोन जणांना ‘धनगड’ म्हणून दिलेले बोगस जात प्रमाणपत्र रद्द करावे, या प्रमुख मागण्यांसाठी येथील पु. अहिल्यादेवी होळकर चौकात चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांनी दि. २८ जूनपासून बेमुदत उपोषण सूरु केले आहे. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा ६ वा दिवस होता. उपोषणाला धनगर समाजातून मोठा पाठिंबा मिळत होता. परंतू, शासन व प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे धनगर समाजाचा शासन व प्रशासनाविरुद्ध रोष वाढला.
या उपोषणाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधुून घेण्यासाठी दि. ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सकल धनगर समाजाच्या वतीने पु. अहिल्यादेवी होळकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पु. अहिल्यादेवी चौकाच्या अगदी मधोमध धनगर समाजाचे नेते व प्रमुख कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. संपूर्ण चौकाला मानवी कडे घातले गेले होते. त्यामुळे या चौकातून एकही वाहन ये-जा करीत नव्हते. पोलीस प्रशासनाच्या वतीने या चौकापासून काहीं अंतरावरच बॅरिकेट लावून पु. अहिल्यादेवी होळकर चौकाकडे जाणारे चारही रस्ते बंद केले होते. रास्ता रोको आंदोलनामुळे अंबोजागाई रोड, नांदेड रिंग रोड, रेल्वेस्टेशन रोड, साई रोडवर तीन-तीन किलो मीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
जिल्हाधिकारी यांची स्वत: आंदोलनस्थळी उपस्थित राहूण धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारावे, असा आंदोलनकर्त्यांचा आग्रह होता. पण समाजातील नेत्यांनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर तब्बल ३ तास १० मिनीटांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र हजारे व गोयकर यांचे बेमुदत उपोषण ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही. उपोषण सुरुच राहणार असल्याचे यावेही जाहीर करण्यात आले.