लातूर : प्रतिनिधी
धनगर समाज अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आक्रमकपद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान दि. ५ जुलै रोजी धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र या बैठकीत काहींच तोडगा निघाला नाही. या बैठकीतील चर्चेने धनगर समाजाचे प्रतिनिधी समाधानी झाले नाहीत. बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण करीत असलेले चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांचे उपोषण सुरुच आहे.
धनगर समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय अथवा शासनाचे अधिकृत शिष्टमंडळ उपोषणकर्ते हजारे व गोयकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे समाधान करीत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही, असा निर्धार हजारे व गोयकर यांनी केला आहे. जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निवेदन मिळाले, ते आम्ही शासनदरबारी पाठवले, हेच सांगण्यात आले. ही बैठक निष्फळ ठरल्याची नाराजी धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.