वलांडी : हसन मोमीन
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानाच्या पारा वाढत असल्याने बाष्पीभवनही वाढले आहे. वलांडी येथील पाटबंधारे सिंचन व्यवस्थापन शाखा कार्यालयांतर्गत असलेल्या साठवण तलावासह धनेगाव उच्चस्तरीय बंधा-यातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. धनेगाव उच्चस्तरीय बंधा-यात ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर दरेवाडी साठवण तलावात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची माहिती शाखा अभियंता दत्ता कोल्हे , आदित्य माने, राहूल जाधव यांनी दिली.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने या सिंचन व्यवस्थापन शाखा अंतर्गत असलेल्या सर्वच लघु व साठवण तलावात मुबलक पाणीसाठा झाला होता. या पाण्याचा उपयोगही चांगल्या प्रकारे शेतक-यांनी करून घेतला. समाधानकारक पावसामुळे उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतक-यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस, कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांची लागवड केली आहे.
तालुक्यात यावर्षी ३९६५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कृष्णा मुंडे, कृषी सहाय्यक समाधान इंगळे यांनी दिली परिणामी आगामी काळात टंचाईची दाहकता लक्षात घेता शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने आदित्य माने, राहूल जाधव, दत्ता कोल्हे महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे यांनी केले आहे.
















