मुंबई : प्रतिनिधी
खोक्या प्रकरणाच्या आडून, माझ्या हत्येचा प्लॅन रचला होता, असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडेंचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आरोप केले आहेत. धसांनी केलेल्या खुलाशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेत, आरोपीवर कारवाई करण्यात यावी, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोघे सत्तेतील व्यक्ती आहेत. ते एकमेकांवर वारंवार आरोप करत आहेत. याचा अर्थ स्पष्ट होतो की गुंडगिरी करणारी माणसं आता सत्तेत आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
धस यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सतीश भोसले प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा प्लॅन रचला होता. बिश्नोई समाजाचे लोक मुंबईत आणण्यात आले होते. त्यांना खोक्याने धसांना हरणाचे मांस कसे पुरवले, याबाबत सांगितले. माझ्या हत्येचा कट आखला होता, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
मुंडेंवर घणाघाती टीका
परळीचे मुंडे आष्टीत आले, सुरेश धसला खोक्याने हरणाचे मांस पुरवले, असे त्यांनी आष्टी मतदारसंघात सांगितले, असा आरोप धनंजय मुंडे यांचे नाव न घेता धसांनी केला आहे. १६ वर्षे मी माळकरी राहिलो आहे. पण डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आता खातो. हरणाचं मांस खाण्यापर्यंत मी अजून गेलेलो नाही. मी प्राणी आणि पक्षीप्रिय आहे, असेही धस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणार
बिष्णोई समाजाच्या दहा ते बारा लोकांना मुंबईत आणले आणि त्यांना उपोषणाला बसवले. त्यांना विमानाने आणले आणि सांगितले या प्रकरणावर बोलायचे. सुरेश धसला हरणाचे मांस खोक्याने पुरवले, असे दाखवण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी माझ्या हत्येचा कट रचला. यात कोणाचा सहभाग आहे, हे मला ठाऊक आहे, ते देखील मी सांगेन. ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगणार, असे धस म्हणाले.