धस-मुंडे भेटीनंतर जरांगे पाटील यांचा तीव्र संताप
बीड : प्रतिनिधी
धनंजय मुंडे क्रूर आहे हे सुरेश धस यांनीच राज्याला सांगितले. याने मला पाडले म्हणाले. त्यामुळे मराठ्यांच्या मनात रोष निर्माण झाला. क्रूर माणसाला भेटला म्हणजे तू पण क्रूरच आहे. तळहातावरच्या फोडाप्रमाणे धसांना मराठ्यांनी जपले. आज त्याच माणसाने कु-हाडीचे वार करून मान तोडून दिली, ज्याला मोठे केले, मराठ्यांनी त्याच्याच अन्नात माती टाकली, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी बैठका घेतल्या, असा खुलासा आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यानंतर सुरेश धस यांनीदेखील धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची कबुली दिली. मात्र, चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. दरम्यान, आता सुरेश धस यांना चारीबाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे. मनोज जरांगेंनीदेखील सुरेश धसांवर जोरदार हल्लाबोल केला.
मनोज जरांगे म्हणाले की, न्याय मिळावा म्हणून सर्व एका छताखाली आले. राजकीय स्वार्थासाठी राजकीय दबावाखाली तुम्ही झिरो मिनिटात होत्याचे नव्हते केले. मुख्यमंत्र्यांनी पाठवले, मी मंत्री असल्यापासून सोडणार नाही, असे म्हटले असते. मात्र, यांची मी समाजात इज्जत वाढवली. आमदाराच्या हाताने एक मिनिटात उपोषण सोडले. समाजाचा माणूस आहे, समाजाचे काम करत आहे म्हणून समाजालाही सांगितले की याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. त्याला भेटायला ते काय कोमात गेले का, एवढा उमाळा एवढं प्रेम का, असा सवालही उपस्थित केला.
तमाशाच्या सगळ््या गवळणी याला येतात, सर्व पिक्चरचे नाव घेतो जुने नवीन, दुसरे काम करतो का नाही, फक्त पिक्चरच बघतो का काय माहिती..अण्णा सगळे असेच असतात की काय? गोपीनाथराव मुंडे यांना जिवंतपणी याच टोळीने मरण यातना दिल्या.. त्या श्रद्धास्थानाला कलंक लावला.. याच टोळीने संतोष देशमुख यांचा फोन केला. त्यांना तुम्ही भेटायला जाता, एवढा वेडा समाज नाही..धस इतक्या लवकर समाजाचे उपकार विसरायचे नव्हते.. धनंजय मुंडे देशमुख कुटुंबाला भेटायला गेले नाही आणि हा मुंडेच्या भेटीला गेला. इतका विश्वासघातकी माणूस बघितला नाही, असेही जरांगे म्हणाले.