पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांची घेतली भेट
मुंबई : प्रतिनिधी
भाजप आमदार सुरेश धस यांनी येत्या २१ जानेवारीला आपण पत्रकार परिषद घेऊन ४ अधिका-यांची नावे सांगत मोठा पर्दाफाश करणार, असल्याचे म्हटले आहे. धस यांनी आज राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विनंती केली. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारे सगळी लोक आहेत, त्यासंदर्भात उच्च पदस्थ विश्वासू अधिका-यांमार्फत चौकशी व्हावी, अशी विनंती केल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली.
बीड येथून गणेश मुंडे याची तातडीने बदली करण्यात आली. त्याच्यावर एसीबीची धाड पडूनदेखील त्याला इथे क्राईम ब्रँचला कुणी आणले? वारंवार भास्कर केंद्रे, गणेश मुंडे, बांगर असे काही नावाचे अधिकारी जे १५ वर्षे एकाच जिल्ह्यात कसे कार्यरत राहू शकतात, याबाबत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना केली, असे सुरेश धस म्हणाले.
आरोपी कृष्णा आंधळेच्या बाबतीत मी पहिल्यापासून सांगत आहे, तो छत्रपती संभाजीनगरला पोलिस भरतीसाठी तयारी करत होता. पण नंतर तो गुन्हेगारीकडे वळला. त्याने जे काही गुन्हे केले, तो यापूर्वीसुद्धा घरादाराची पर्वा न करता बाहेर पडला आहे. तो लवकरात लवकर सापडला पाहिजे. तो या प्रकरणात एकटाच शिल्लक आहे. आतापर्यंत ९ आरोपी ३०२ गुन्ह्यात जेलमध्ये गेले आहेत, असे धस म्हणाले.
कृषि विभागाच्या
घोटाळ््यावर बोलणार
कृषी विभागाचा घोटाळा हा किती बेमालूमपणे करण्यात आला आहे आणि शेतक-यांना फसवण्यात आले आहे, त्यानंतर तिथले रेट कार्ड काय आहेत, कुणाच्या पोस्टिंगचे काय रेट आहे, हे मी परवा सांगणार आहे. कारण उद्या शिवरायांची जयंती आहे. त्यामुळे मी २१ तारखेला पर्दाफाश करेल. त्यामध्ये कोण कोण अधिकारी जबाबदार आहेत, मंत्री कोण जबाबदार आहे ते मी सांगेल. मी ४ अधिका-यांची नावेदेखील परवा सांगेन, असा इशारा सुरेश धस यांनी दिला.