25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रधारावी पुर्नविकास प्रकल्पाचे भीतीपोटी गुपचुप भूमिपूजन

धारावी पुर्नविकास प्रकल्पाचे भीतीपोटी गुपचुप भूमिपूजन

भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन सध्या मोठा वाद सुरु झाला आहे. महाविकास आघाडीने या प्रकल्पाला जाहीर विरोध केला आहे. अदानी समूहाकडे या पुनर्विकास प्रकल्पाचे काम देण्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नकार दिला आहे असे असतानाही धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उरकण्यात आला. माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी करण्यात आले. या भूमिपूजनावरुन आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे. विरोधाला घाबरुन अदानींकडून गुपचूप भूमिपूजन केल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन सुरु असलेल्या राड्यावरून गोंधळ टाळण्यासाठी कोणताही गाजावाजा या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. माटुंग्यातील सेक्टर ६ येथे रेल्वे कर्मचा-यांचे निवासस्थान आणि कार्यालयांच्या बांधकामाला सुरुवात करत हा भूमिपूजन सोहळा करण्यात आला. महाराष्ट्र सरकार व अदानी समूहाची संयुक्त कंपनी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पहाटे चार ते सात वाजण्याच्या दरम्यान माटुंग्याच्या आरपीएफ मैदानावर हा भूमिपूजन सोहळा पार पडला.

या भूमिपूजन सोहळ्यावरुन धारावीच्या माजी आमदार आणि नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकास्त्र डागले आहे. भूमिपूजनाचा नारळ फोडण्याचे काम घाईघाईने आणि छुप्या पद्धतीने झाले. कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडताना एवढे घाबरण्याचे कारण काय होते? यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असून यांच्याकडून जमिनी घेण्याचे काम चालू आहे त्याच्याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. म्हणून घाबरुन त्यांनी भूमिपूजन केले. आमचा त्याला विरोध आहे. लोकांना बरोबर न घेता कुठला विकास होऊ शकतो का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.

आता विरोध करणार : गायकवाड
सदर कार्यक्रमाचे कोणालाच निमंत्रण नव्हते. एका खोलीत भूमिपूजन करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे मित्र आहेत म्हणून त्यांना मोक्याच्या जागा दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री सांगतात मिठागरांच्या जागांवर कोणतेही बांधकाम होत नाही. पण तिथेच इमारत बांधता येऊ शकते का? हे काम होणार नाही. आमचा विरोध आता तुम्हाला दिसेल असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR