15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeधाराशिवधाराशिवमध्ये दोन कारचा भीषण अपघात; ४ ठार

धाराशिवमध्ये दोन कारचा भीषण अपघात; ४ ठार

धाराशिव : प्रतिनिधी
ऐन दिवाळीत आक्रित घडले अन् उत्सवावर शोककळा पसरली आहे. धाराशिवमध्ये दोन महागड्या आलिशान कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कार वेगात होती त्याचवेळी अचानक रस्त्यावर कुत्रा आल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर हा अपघात झाला. दोन वाहनांच्या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

उमरगा तालुक्यातील डाळिंबजवळ सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सफारी आणि ग्रँड वितारा या दोन महागड्या गाड्यांची जोरदार धडक झाली. या अपघातात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी चार जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत.

पोलिसांकडून अपघातामधील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात मृत्यू झालेले चारही जण बिदर येथील होते. तर जखमी झालेले दोन जण सोलापूर येथील आहेत. त्यांच्यावर सोलापूरमधील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडी चालवताना कुत्रे आडवे आल्याने कुत्र्याला वाचवताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातात मृत्यू झालेले ४ जण धाराशिव जिल्ह्यातून आज सकाळी खासमपूर बिदरकडे जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. दिवाळीच्या उत्सवात हे चार जण बिदरला अतिशय वेगाने जात होते. त्यावेळी सोलापूर-हैदराबाद महामार्गावर डाळिंब गावाजवळ अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला. वेगात असलेली गाडी डिव्हायडर तोडून विरोधी दिशेने जाणा-या रस्त्यावर गेली. त्यावेळी समोर आलेल्या दुस-या गाडीला जोरात धडक झाली. समोरून येत असणारी ग्रँड वितारा ही गाडीही अतिशय वेगात होती. कुत्र्याला वाचवायला गेलेल्या सफारी गाडीचा अपघात झाला. यात चौघांचा मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR