धाराशिव : प्रतिनिधी
कुमाळवाडी शिवारात झालेल्या निर्घृण खुनाच्या प्रकाराने धाराशिव हादरले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत गुन्हाच्या छडा लावला. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे तपासातून पुढे आहे. या भयंकर प्रकाराने धाराशिव परिसरात खळबळ उडाली असून आरोपी पत्नीसह, प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
१३ जुलै रोजी कुमाळवाडी शिवारात एकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह नागरिकांना आढळला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. धाराशिव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वसुदेव मोरे आणि त्यांच्या सगका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना मृतदेहाच्या शेजारी एक दुचाकी उभी असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने दुचाकीच्या नंबरवरूनच मालकाचे नाव काढले. त्यावरून ही मृत व्यक्ती येदशी येथील दगडू देशमुख (वय ४०-४५) असल्याचे स्पष्ट झाले.
दगडू देशमुख यांच्या अंगावर गंभीर जखमा असल्याने त्यांचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला वेग दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीभक वोन पवार यांनी घटनास्थली जात पाहणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत दगडू देशमुख यांच्या पत्नीचे दुस-यासोबतच जुळले होते. या संशयावरून पोलिसांनी बालाजी महादेव पायघन (रा. पांगरी, ता. बार्शी) याचा शोध सुरू केला. तेव्हा तो मेहुण्यासोबत पुण्याला गेल्याचे समजले. यावरून धाराशिव पोलिसांनी तातडीने पुणे पोलिसांसोबत संपर्क साधला. तसेच आरोपी बालाजी पायघन आणि त्याचा साथीदार सोमनाथ सातनाक यांना ताब्यात घेतले.
















