धाराशिव : प्रतिनिधी
सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील विधायक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने धाराशिव शहरात विलासराव देशमुख सेंटर स्थापन करण्यात येत आहे. या धाराशिव जिल्हा शाखेच्या सेंटरचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येत आहे. धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे होणा-या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार राहणार आहेत. यावेळी दैनिक लोकमत, पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांना एकत्र आणून विधायक उपक्रम राबविण्याचा मानस सेंटरच्या जिल्हा शाखेने व्यक्त केला आहे.
या उद्घाटन सोहळ्यास जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या प्रशांत पाटील, रविंद्र केसकर, अग्निवेश शिंदे, अॅड. राज कुलकर्णी, प्रा. सोमनाथ लांडगे, सुधीर सस्ते, प्रा. रवी निंबाळकर, प्रा. अजित शिंदे, अॅड.अनिकेत देशमुख, डॉ. सायम रझवी, डॉ. सुधीर शिंदे, सुनील बडूरकर, शशिकांत वैराळे यांनी केले आहे.
















