22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeधाराशिवधाराशिव जिल्ह्याचा ‘ओके’ पॅटर्न....

धाराशिव जिल्ह्याचा ‘ओके’ पॅटर्न….

कळंब : सतीश टोणगे
कोणत्याही पक्षाला आपला कार्यकर्ता आपल्याशी निष्ठावंत असावा असेच वाटत असते. पण अलीकडच्या काळात निष्ठेची व्याख्या मात्र बदलत चालली आहे.
निष्ठावंत कोण..? कुणाला म्हणायचे…! निष्ठा कोणावर ठेवायची, या सर्व प्रश्नांची उत्तरे व यावरची मोठी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीत झाली. एखाद्याने हा विषय घेतला तर त्यात डॉक्टरेट मिळू शकेल. राज्याचे राजकारण कधी नव्हे ते गढूळ झाले, तर राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आपलेसे करण्यात भाजपला यश आले. पण यांचा प्रभाव किती पडला हे, निकालानंतर स्पष्ट होईल.

प्रत्येक मतदारसंघात खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य फोडून प्रचारात रंगत आली. राज्यात भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यात यश आले, याचा परिणाम ग्रामपातळीवरही जाणवला. पक्ष फुटल्याने उद्धव ठाकरे, शरद पवार घायाळ झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना दोन्ही पक्ष खिळखिळे करण्याचा आनंद झाला.

धाराशिव जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आ. कैलास दादा पाटील हे सुटका करून वापस येऊन ठाकरे कुटुंबासोबत राहिले, तर विद्यमान खा. ओमराजे निंबाळकर यांनी खोक्याला भीक न घालता शेवटपर्यंत ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले. राज्यात या जोडीने मात्र, ‘ओके पॅटर्न’च्या निष्ठेचे दर्शन घडवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सर्व विधानसभा मतदारसंघांत सभा घेऊन खा.ओमराजे व शिवसैनिकांना बळ दिल्याने पालकमंत्री यांना मात्र मोठा हाबाडा बसला. खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांचा दांडगा संपर्क असल्याने नेत्यापेक्षा मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतली होती. सुरुवातीच्या काळात पालकमंत्री नाराज होते, नंतर ते प्रवाहात आले असले तरी, ‘घड्याळाला’ मतदान करणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतल्याची मोठी चर्चा या मतदारसंघात होती.

खा. ओमराजे निंबाळकर हे आक्रमक पवित्रा घेतात तर आ. कैलास पाटील हे शांत व संयमी आहेत. त्यामुळे दोघांचा,‘ओके पॅटर्न’ सर्वांना परिचित आहे.
राज्यातील बहुतांश मतदारसंघांत खासदार, आमदार यांचे पटत नाही. त्यामुळे गटा-तटाचे राजकारण पाहायला मिळते. पण धाराशिवमध्ये मात्र वेगळेच आहे. लोकसभेची प्रचार यंत्रणा आ. कैलास पाटील यांनी राबवली होती. राज्यात निष्ठावंत जोडी म्हणून यांची वेगळी ओळख असून राज्यामध्ये ‘ओके पॅटर्न सध्या चर्चिला जात आहे. अशा वागण्याने पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR