सिंचन वाढल्याचा फायदा : यंदा विक्रमी ७१ लाख टन उसाचे गाळप, ६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
सुभाष कदम
धाराशिव : मागास जिल्हा, ही धाराशिवची ओळख आता पुसत चालली आहे. धाराÞशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या खिशात यंदा २ हजार कोटी रुपये आले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने, गूळ पावडर कारखान्यांनी यंदा विक्रमी ७१ लाख टन उसाचे गाळप करून ४८ लाख क्विंटल साखर आणि १२ लाख क्विंटल गूळ पावडरचे उत्पादन केले. गेल्यावर्षी जिल्ह्यात ५५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गाळप वाढल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचा फायदा शेतक-यांना होत आहे. जिल्ह्यातील चालू असलेल्या १४ सहकारी, खाजगी साखर कारखान्यांत हे गाळप झाले. गूळ पावडरचेही जिल्ह्यात १२ कारखाने सुरू होते. नगदी पीक म्हणून शेतकरी उसाला पसंती देतात. २०२५-२६ या हंगामात जिल्ह्यातील सहकारी व खाजगी अशा १४ साखर कारखान्यांनी ६० लाख ९१ हजार १६१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४८ लाख २४ हजार ८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. १२ गूळ पावडर कारखान्यांनी १० लाख टनाचे गाळप करून १२ लाख क्विंटल गूळ पावडर पोत्याचे उत्पादन घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे गाळप उच्चांकी असून, गेल्यावर्षी ४५ लाख मेट्रिक टनाचे गाळप झाले होते.
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगरने (तेरणा) ४ लाख ८१ हजार ९५८ टनाचे गाळप करून ३ लाख ६१ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन केले. मंगरूळ ता. तुळजापूर येथील कंचेश्वर (मांजरा) शुगरने ६ लाख २९ हजार ३२८ टनाचे गाळप करून ६ लाख ३५ हजार ४०० क्विंटल साखरेचे, आयन मल्टीट्रेड (बाणगंगा) शुगरने ५ लाख ७६ हजार ९४८ टनाचे गाळप करून २ लाख ७६ हजार ८७० क्विंटल साखरेचे, केशेगाव येथील डॉ. आंबेडकर शुगरने ५ लाख १० हजार ९६९ टनाचे गाळप करून ४ लाख ५७ हजार २३० क्विंटल साखरेचे, क्वीनर्जी इंडस्ट्रीज (भाऊसाहेब बिराजदार) शुगरने ५ लाख ७८ हजार १०५ टनाचे गाळप करून ३ लाख २५ हजार १०० क्विंटल साखरेचे, चोराखळी ता. कळंब येथील धाराशिव शुगरने २ लाख १७,५६९ टनाचे गाळप करून १ लाख ७५ हजार ५० क्विंटल साखरेचे, हावरगाव ता. कळंब येथील डीडीएन शुगरने ३ लाख १ हजार ४७९ टनाचे गाळप करून २ लाख ६६ हजार ८४० क्विंटल साखरेचे, पारगाव ता. वाशी येथील भीमाशंकर शुगरने १ लाख ४८ हजार ४०५ टनाचे गाळप करून १ लाख १६ हजार ९०० क्विंटल साखरेचे, रांजणी ता. कळंब येथील एनसाई शुगरने ९ लाख ७९ हजार ८० टनाचे गाळप करून ८ लाख ५२ हजार ९५० क्विंटल साखरेचे, खेड ता. लोहारा येथील लोकमंगल माऊली कारखान्याने ५ लाख ७७ हजार ४०४ टनाचे गाळप करून ४ लाख १९ हजार ३३० क्विंटल साखरेचे, सोनारी ता. परंडा येथील भैरवनाथ शुगरने ५ लाख ११ हजार १ टनाचे गाळप करून ३ लाख ८८ हजार ५५० क्विंटल साखरेचे, इंदापूर ता. वाशी येथील नरसिंह कारखान्याने ७६ हजार १०४ टनाचे गाळप करून ५९ हजार १२५ क्विंटल साखरेचे, तांदुळवाडी ता. वाशी येथील भैरवनाथ शुगरने १ लाख ९४ हजार ८६५ टनाचे गाळप करून १ लाख ७५ हजार ३८० क्विंटल साखरेचे, मुरूम ता. उमरगा येथील विठ्ठलसाई कारखान्याने ३ लाख ७ हजार ९२५ टनाचे गाळप करून ३ लाख १३ हजार ६६० क्विंटल साखरेचे गाळप केले.
गूळ पावडर कारखान्यांचे मोठे गाळप
जिल्ह्यातील १४ गूळ पावडर कारखान्यांमध्ये पाडोळी ता. धाराशिव येथील रुपामाता शुगर, कसबे तडवळे येथील एसपी शुगर, खामसवाडी ता. कळंब येथील श्री सिद्धीविनायक शुगर, जागजी ता. धाराशिव येथील एनव्हीपी शुगर, केमवाडी ता. तुळजापूर येथील तुळजापूर शुगर, मोहा ता. कळंब येथील मोहेकर शुगर, कळंब तालुक्यातील हातलाई शुगर, वाठवडा येथील डीडीएन शुगर, तुळजापूर तालुक्यातील रुपामाता व सिद्धीविनायक शुगर आदी गूळ पावडर कारखान्यांनी जवळपास १० लाख टनाचे गाळप केले.
१६ वर्षांत उसापासूनचे
उत्पन्न तिप्पट वाढले!
जिल्ह्यात २०१० मध्ये ३० लाख टन उसाचे गाळप झाले होेते. त्यावेळी शेतक-यांना ६२५ कोटी रुपये मिळाले होते. यंदाच्या गळीत हंगामात ७१ लाख टन उसाचे गाळप झाले. यापोटी शेतक-यांना २००० कोटी रुपये मिळाले. कारखान्यांनी उसाला प्रतिटन सरासरी २८०० रुपये भाव दिला. सिंचनाच्या सुविधा वाढल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे उत्पन्न १६ वर्षात तिपटीने वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी लखपती बनले.
















